राष्ट्रीय ज्युदो स्पर्धा: अथश्री, रुचाला सुवर्णपदक

0

मुंबई । मार्तंड स्टेडियम, रेवा, मध्य प्रदेश येथे चालू असलेल्या 19 वर्षाखालील ज्युडोच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलांनी सांघिक विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राला दोन सुवर्ण आणि पाच कांस्यपदके मिळाली. मुंबईच्या अथश्री देशमुख आणि पुण्याच्या ऋचा धोपेश्वर यांनी महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले. स्पर्धेत पुरुष गटात हरियाणाने बाजी मारली. महाराष्ट्राच्या अथश्री देशमुख (मुंबई शहर) हिने 70 वजना वरच्या मुलींच्या गटात सुवर्णपदक प्राप्त केले अथश्री ची अंतिम लढत दिल्लीच्या हर्षा सटीजा हिच्यासोबत झाली. अत्यंत चुरशीच्या या सामन्यात पहिल्यांदा हर्षा 2 वजारी गुण घेत विजयाच्या दिशेने घोडदौड करत होती. मात्र, शेवटच्या 15 सेकंदात सामन्याला कलाटणी देत अथश्रीने शियो ओतोशी म्हणजेच बाहेरून खांद्यावरून फिरवून याको केसा गटामे म्हणजेच बाजूने तिच्यावर पकड मिळवत घेत इप्पोन हा पूर्ण गुण प्राप्त करत सुवर्णपदक मिळवले.

ऋचा धोपेश्‍वर (पुणे) हिने 70 वजनाखाली मुलींच्या गटात सुवर्णपदक प्राप्त केले. तिने अंतिम लढत कर्नाटकच्या एस. मोनिका हिच्याबरोबर दिली ज्यात तिने ओसोटोगरी म्हणजेच बाहेरून फेकत तिच्यावर विजय मिळवला आणि सुवर्णपदक प्राप्त केले. महाराष्ट्राच्या सौरभ माने (सातारा), निशांत गुरव ( कोल्हापूर ), रोहिणी मोहिते( अमरावती ), ओंकार देसाई ( साई औरंगाबाद ) आणि आशिष उघडे ( साई औरंगाबाद ) यांनी कास्यंपदक प्राप्त केले.