धुळे। राष्ट्रीय डेंग्यु दिन जिल्हा हिवताप कार्यालय, धुळे येथे साजरा करण्यात आला. वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण व दळणवळण, पाणी साठविण्याची वृत्ती, सांडपाण्याच्या निचर्याचा अभाव या कारणामुळे जागतिक स्तरावर मानवी आरोग्याच्या प्रमुख समस्यांपैकी डेंग्यु आजार ही एक गंभीर समस्या उभी आहे. या आजाराबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने हिवताप कार्यालय, महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय डेंग्यु दिन साजरा करण्यात आला. डेंग्यु दिनानिमित्त प्रदर्शन व जनजागृती कार्यक्रम ठेवण्यात आला.
डेंग्यु जनजागरणपर लावण्यात आले प्रदर्शन
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डॉ.चित्तम, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय धुळे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा.डॉ.आर.व्ही.पाटील, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.धुळे, डॉ.महेश मोरे, आरोग्यअधिकारी मनपा धुळे व प्रशिक्षणार्थी परिचारिका उपस्थित होते.डॉ.प्रदीप वैष्णव जिल्हा हिवताप अधिकारी धुळे यांनी राष्ट्रीय डेंग्यु दिनाविषयी प्रस्तावना केली. अध्यक्षीय भाषणात डेंग्यु आजार नियंत्रणासाठी शासकीय प्रयत्नांबरोबरच लोक सहभागाची सुद्धा नितांत आवश्यकता आहे, लोक सहभाग मिळाला तरच डेंग्यु आजारांवर नियंत्रण मिळविणे शक्य होईल. यासाठी नागरिकांना डासउत्पत्ती स्थाने नष्ट करावीत व आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा असे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी मार्गदर्शन केले. तद्नंतर मान्यवरांनी डेंग्यु विषयक जनजागरणपर लावण्यात आलेले प्रदर्शन पाहिले. या प्रदर्शनाची माहिती कोमलसिंग सिसोदिया यांनी सांगितली.