धुळे : जिल्ह्यातील शाळा, विद्यालयांच्या परिसरात तंबाखू, गुटखा विक्री होत असेल तर ही गंभीर बाब असून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची जिल्ह्यात शासकीय यंत्रणांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात शनिवारी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत प्रथम जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय शिंदे, डॉ.चंद्रकांत येशीराव, डॉ. हर्षदा पवार, डॉ. अनुराधा लोया, डॉ. प्रदीप पाटील यांच्यासह तालुका आरोग्याधिकारी उपस्थित होते.
नियमितपणे आढावा घेण्यात यावे
जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे म्हणाले सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादनांची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जाहिरात करण्यास 2003 च्या कलम 5 नुसार बंदी आहे. या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी होऊन नियमितपणे आढावा घेण्यात यावा. शाळा, विद्यालय परिसरात गुटखा, तंबाखू विक्रीच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. अन्न व औषध प्रशासनाने तपासणी मोहीम राबवून कार्यवाही करावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांनी यावेळी दिले. डॉ. शिंदे यांनी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची माहिती दिली. तत्पूर्वी गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत आढावा बैठक झाली.