जळगाव । राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत तंबाखू उत्पादनांच्या सेवन. विक्री व वापराला बंदी करण्यासाठी तंबाखू नियंत्रण कायदा 2003 करण्यात आला असून या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकारही संबंधित अधिकार्यांना देण्यात आले आहेत. प्रत्येक अधिकार्याने आपापल्या कार्यक्षेत्रात तंबाखू नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, असे आदेश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय समितीची 18 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, चिटणीस मंदार कुलकर्णी, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तासलेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.आर. पाटील, अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त एम.डी.शहा, उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर, दुकाने निरीक्षक श्रीमती चौधरी, समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. निलेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
तंबाखूजन्य माल बाजारातून केले जप्त
डॉ. बोराडे यांनी तंबाखू नियंत्रण अधिनियम 2003 या कायद्याची व त्याच्या अंमलबजावणी संदर्भात माहिती दिली. या कायद्यान्वये अन्न औषध प्रशासन विभागाने सतरा लाख रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य माल बाजारातून कारवाई करुन जप्त केला असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. अन्न औषध प्रशासन विभागाने केलेली कारवाई सन 2016-17 मध्ये एकूण 36 कारवाई करुन 34 लाख 44 हजार 253 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. त्यात पान मसाला, गुटखा, सुगंधीत सुपारी, सुगंधी तंबाखू उत्पादनांची विक्री, साठवण तसेच विहित आकारात सावधानतेचा इशारा नसणे आदी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती अन्न औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त एम.डी. शहा यांनी दिली.
अहवाल सादर करण्याचे निर्देश
तंबाखू नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी करुन संबंधित अंमलबजावणी अधिकार्यांनी त्यांचा अहवाल समितीकडे सादर करावा. समितीच्या बैठकांना पोलीस अधिकार्यांनीही उपस्थित रहावे, अशी सुचनाही जिल्हाधिकार्यांनी यावेळी केली. जिल्हा रुग्णालयातील दंत शल्य चिकित्सक डॉ. बोराडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.