राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतून सायना, सिंधूची माघार

0

नवी दिल्ली : राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतून सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या स्टार खेळाडूंनी पुन्हा एकदा माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बॅडमिंटनप्रेमींचा उत्साह कमी झाला आहे. असे असले तरी यंदाच्या ८१व्या राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपदासाठी कडवी चुरस रंगणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्याच आठवड्यात सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बाजी मारून आपले पहिले ग्रां. प्री. गोल्ड स्पर्धा जिंकणारा गतविजेता समीर वर्मा, त्याचाच मोठा भाऊ आणि माजी विजेता सौरभ वर्मा, स्विस ओपन चॅम्पियन एच. एस. प्रणय यांच्यामध्ये विजेतेपदाची मुख्य लढत रंगेल.

समीरने सांगितले, ‘‘सय्यद मोदी स्पर्धा जिंकल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला आहे. याचा फायदा मला राष्ट्रीय विजेतेपद कायम राखण्यात होईल. राष्ट्रीय स्पर्धेत सातत्य राखण्यास मी पूर्णपणे सज्ज आहे.’’ त्याच वेळी मुंबईचे हर्षिल दाणी आणि जोशी बंधू प्रतुल-आदित्य यांनीही चमकदार कामगिरीचा निर्धार केला आहे. दुसरीकडे, रिओ आॅलिम्पियन श्रीकांत कदाम्बी, राष्ट्रकुल चॅम्पियन पारुपल्ली कश्यप आणि आर. एम. व्ही. गुरुसादत्त दुखापतींमुळे या स्पर्धेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, अन्य नामांकित खेळाडू अजय जयरामनेही स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. महिला एकेरीत गतविजेती आणि बलाढ्य सिंधू खेळणार नसल्याने तन्वी लाड, माजी विजेती ऋत्विका शिवानी आणि रितुपर्णा दास यांना राष्ट्रीय विजेतेपद उंचावण्याची संधी असेल.