राष्ट्रीय मतदार दिनानिमित्ताने मावळ तहसील कार्यालयातर्फे आयोजन

0

लोणावळा (प्रतिनिधी) – राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी मावळ तहसिल कार्यालयाच्या वतीने लोणावळ्यातील डॉ. बी. एन. पुरंदरे कला आणि श्रीमती एस. जी. गुप्ता वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (लोणावळा महाविद्यालय) तसेच सिंहगड इंस्टिट्यूट याठिकाणी मतदार जागृती अभियान राबविण्यात आले. यामध्ये वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

लोकशाहीच्या बळकटीसाठी जागृतीची गरज
लोणावळा महाविद्यालयात मतदार साक्षरता क्लबचे उद्घाटक मावळचे उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना भागडे यांनी लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदार जागृतीची गरज असल्याचे सांगितले. त्यासाठी संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे सचिव दत्तात्रय पाळेकर, सर्कल बजरंग मेकाले यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होत्या.

प्रलोभनाला बळी न पडण्याची शपथ
सिंहगड इंस्टिट्यूट याठिकाणी सकाळी जनजागृती रॅली काढून अभियानाला सुरुवात केली. सिंहगड महाविद्यालयामध्ये मतदार क्लबचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषणात उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे यांनी लोकशाहीमध्ये मतदानाचे महत्व पटवून दिले. यावेळी मतदारांनी निपःक्षपाती मतदान करून कसल्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी पडणार नाही अशी शपथ घेतली. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सिंहगड इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी लोकजागर या विविध सामाजिक विषयांवर प्रकाश टाकणार्‍या नाटकांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या लोकजागर कार्यक्रमाचे उद्घाटन लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी ज्ञानेश्‍वर शिवथारे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. डॉ. एम. एस. गायकवाड, डॉ. चौधरी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. विक्रमसिंह मगर, प्रा. सुयोग गढारी उपस्थित होते.