राष्ट्रीय महत्त्वाकांक्षाच देश पुढे नेते

0

तळेगाव दाभाडे । राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा असल्याशिवाय भारत पुढे जाऊ शकत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी गणेश मंदिर प्रांगण, राजगुरव कॉलनी, तळेगांव स्टेशन येथे रविवारी केले. श्री गणेश प्रतिष्ठान तीन दिवसीय गणेश व्याख्यानमालेत ‘2022 चा भारत’ या विषयावरील अंतिम पुष्प गुंफताना भंडारी बोलत होते. आमदार बाळा भेगडे अध्यक्षस्थानी होते. नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, नगरसेविका नीता काळोखे, नगरसेवक संतोष शिंदे, नगरसेविका शोभा भेगडे, संतोष दाभाडे, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बच्चुशेठ तांबोळी, सचिव धनंजय गुणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सामर्थ्यासाठी उणिवा दूर साराव्या लागतील
यावेळी जल, वृक्ष आणि देशी गाय यांच्या संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणार्‍या ‘देवराई’ या संस्थेला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भंडारी पुढे म्हणाले की, इ.स.2022 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्षे पूर्ण होतात. हा काळ खूप मोठा असला तरी दहा हजार वर्षांचा ज्ञात इतिहास असलेल्या दृष्टीने पंचाहत्तर वर्षांचा कालखंड हा अतिशय छोटा टप्पा आहे. इ.स.2022 मध्ये भारतीयांचे सरासरी वय हे पंचवीस असेल. त्यामुळे तारुण्यात शिरणारा भारत हा सामर्थ्यवान, तडफदार, बलवान असायला हवा असेल तर त्यातील काही उणिवा, त्रुटी, दुर्गुण दूर करणे आवश्यक आहे. त्यानंतर जग आपल्याकडे म्हणून बघेल.