एरंडोल । राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील दोन्ही बाजूच्या साईड पट्ट्या मूळ रस्त्यांपासून सुमारे एक ते दीड फुट खोल गेल्यामुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना होऊन जीवित व वित्तहानी होण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्यांनी या समस्येकडे दुर्लक्ष केल्यामुळे सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील पातरखेडा फाटा ते झीरीनाल्यापर्यंत यामार्गावर असलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईड पट्ट्या सुमारे एक ते दीड फुट खोल गेल्या आहेत. बसस्थानकासमोरील साईड पट्ट्या सुमारे दोन ते अडीच फुट गेल्या असुन त्या ठिकाणी रस्त्याला बसण्यासाठी वापरण्यात येणार्या बाकाचे स्वरूप आले असुन याठिकाणी येणारे प्रवासी खोल गेलेल्या रस्त्याचा बसण्यासाठी वापर करीत आहेत.
वाहने उलटून अपघात होण्याची शक्यता
रस्त्याच्या साईड पट्ट्या खोल गेल्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे. यापूर्वी खोल गेलेल्या साईड पट्ट्यामुळे अनेक वाहने पलटून अपघात झाले असुन देखील सबंधित अधिकार्यांनी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. यापूर्वी साईड पट्ट्यानमुळे अपघात झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. सबंधित अधिकार्यांनी लवकरच साईड पट्ट्या भरून रस्ता योग्य पद्धतीने करण्याचे आश्वासन देऊन देखील साईड पट्ट्यांची अद्यापपर्यंत दुरुस्ती करण्यात आलेली नाही. बसस्थानकासमोर कायम वाहनांची वर्दळ असते. तसेच प्रवासी देखील मोठ्या संखेने असतात. शहराबाहेरील नव्याने स्थापन झालेल्या वसाहतींमधील रहिवाश्यांची देखील येणारे व जाणारे याच मार्गावरून होत असल्यामुळे साईड पट्ट्या भरणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी तसेच लोक प्रतिनिधींनी दाखल घेऊन महामार्गावरील खड्डे बुजवावेत व साईड पट्ट्यांची दुरुस्ती करून प्रवाशांना दिलासा द्यावा. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.