राष्ट्रीय महामार्गावरील छेद रस्ते बंद करण्याची गरज

0
लोणावळा ग्रामीण पोलिसांची आयआरबीकडे मागणी
लोणावळा : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मनशक्ती केंद्र ते फांगणे वसाहत दरम्यान होणारे प्राणांतिक व लहान-मोठे अपघात रोजच होत आहेत. अपघाताला कारणीभूत ठरणारे रस्ता दुभाजकांमधील छेद रस्ते बंद करण्याची मागणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आयआरबीकडे केली आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांच्या आदेशान्वे ग्रामीण पोलिसांनी मनशक्ती केंद्र वरसोली ते फांगणे वसाहत दरम्यान रस्त्यांची पाहणी केली असता, या परिसरात असलेल्या 26 छेद रस्त्यांपैकी 12 रस्ते अनावश्यक असल्याचे समोर आले आहे.
संदीप पाटील यांना अहवाल सादर
हे छेद रस्ते बंद करण्याबाबत आयआरबीला लेखी सुचना करण्यात आल्या असल्याचे लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांनी सांगितले. याबाबतचा अहवाल पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना देण्यात आला आहे. मागील वर्षी देखील अनावश्यक छेद रस्ते बंद करण्याबाबत कळवूनही आयआरबीने कारवाई केलेले नाही. मागील दोन दिवसात लोणावळा ग्रामीण परिसरात पाच अपघातांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी तीन जणांचा मृत्यु हा छेद रस्त्यावरुन वळताना झाला आहे. हे छेद रस्ते बंद केल्यास तसेच गावाच्या ठिकाणी असलेल्या छेद रस्त्यांवर ब्लिंकर लाईट लावल्यास अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल असे ग्रामीण पोलिसांनी सांगितले.