चाळीसगाव। राष्ट्रीय महामार्गावरील चाळीसगाव-कन्नड रस्त्यावरील एका हॉटेलजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी, 21 नोव्हेंबर रोजी उघडकीला आली आहे. दरम्यान, याप्रकरणी ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
सविस्तर असे, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 212 वरील चाळीसगाव – कन्नड रस्त्यावरील सदिच्छा हॉटेलजवळील झालेल्या भीषण अपघातात हर्षल संतोष ठाकरे (वय-28, रा. सांगवी, ता. चाळीसगाव) व बोंबेदर कुमार उर्फ बॉबी खिलालाल सहा (वय 22, रा. धनसनि भांदलगाव, राज्य उत्तराखंड) या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करुन पंचनामे केले. दरम्यान मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हर्षल संतोष ठाकरे हा हॉटेलवर कामे करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. परंतु या अपघातामुळे त्याच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार सुरू आहे.