राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्हाभरातील 4 हजार 273 खटले निकाली

0

जळगाव- जळगाव जिल्हा व त्याअंतर्गत असलेल्या तालुक्यातील सर्व न्यायालयासह शहरातील कुटुंब न्यायालयात रविवारी राष्ट्रीय लोकअदालत झाली. यात जिल्हाभरातील 4 हजार 273 प्रलंबित खटले 19 कोटी 75 लाख 95 हजार 749 रुपयांची प्रकरण तडजोडीव्दारे निकाली निघाले आहेत. यंदा जिल्हा विधी सेवा प्राधीकरणामार्फत करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे नागरिकांचा राष्ट्रीय लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरातील कुटूंब न्यायालयात पहिल्या लोकअदालतीत 8 प्रकरणे निकाली निघाली.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधीकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी मुंबई यांच्या निर्देशानुसार 17 मार्च रोजी जिल्हा विधी सेवा प्राधीकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ, जळगांव यांचे संयुक्त विद्यमाने अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी ए सानप, यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकअदालते झाली. संकल्प गीत वाजविण्यात येवून लोकअदालतीला सुरुवात करण्यात आली. या लोकअदालतीच्या अनुषंगाने सामान्य नागरिकांना लोकअदालत व त्यामधील तडजोडीचे महत्व समजविण्यात आले. याप्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.ए .सानप, तसेच इतर न्यायाधीश, जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव के.एच. ठोंबरे, जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. पी. बी. चौधरी, तसेच विधीज्ञ व कर्मचारी वर्ग तसेच पक्षकार हजर होते.

वादपूर्व 3 हजार 533 प्रकरणे निकाली
जलद आणि सोप्या पध्दतीने न्याय मिळावा या संकल्पनेतून पक्षकार त्याचप्रमाणे शासनाचे विविध विभागातील अधिकारी- कर्मचार्‍यांना आवाहन करुन सदर राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जळगाव जिल्हयात प्रकरणे ठेवण्यात आली होती. विशेष बाब म्हणजे हजारोंच्या संख्येने प्रकरणे ठेवण्यात आली होती. यात न्यायालयात प्रलंबित असलेली 740 इतकी प्रकरणे आणि वादपुर्व प्रकरणांपैकी 3 हजार 533 इतकी प्रकरणे ही निकाली झाली आहेत. सदर राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकुण 4,273 इतकी प्रकरण ही तडजोडीद्वारे निकाली निघाली. 19 कोटी 75 लाख 95 हजार 749 एकूण एवढ्या रकमेची प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली निघाली. यामुळे दोन्ही पक्षांचा वेळेची व पैशाची बचत झाली.यानिमित्ताने लोकअदालत या संकल्पनेचा अनेक गावांगावांमध्ये प्रचार व प्रसार झाल्याने प्रतिसाद लाभला.

कुटूंब न्यायालयात पहिली लोकअदालत ; 8 प्रकरणे निकाली
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार शहरातील जुने बी.जे. मार्केट येथे नव्याने स्थापन झालेल्या कौटुंबिक न्यायालयात रविवारी पहिले राष्ट्रीय लोकअदालत झाली. कौटुंबिक वादातील एकूण 34 प्रकरणे पॅनलसमोर ठेवण्यात आली. त्यापैकी 8 प्रकरणे निकाली निघाली.

कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश चित्रा हंकारे यांनी दिप प्रज्वलीत करुन लोक न्यायालयाचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव के. एच. ठोंबरे हे होते. मेरा मंगल. मेरा मंगल सबक मंगल… ही सामुहीक विश्व प्रार्थना केल्यानंतर कामाला सुरुवात झाली. तदर्थ जिल्हा न्यायाधीश ओ.के. भुतडा, तर पंच म्हणून वकील एस.एस.रुणवाल,, श्रीमती श्रध्दा काबरा वकील यांच्या पॅनलची नेमणूक करण्यात आली. त्यांच्यासमोर कौटुंबिक वादातील एकूण 34 प्रकरणे ठेवण्यात आली. यात 22 प्रकरणात पक्षकार हजर होते. त्यापैकी 8 प्रकरणे निकली काढण्यात आली. लोकन्यायालयाचे यशस्वीतेसाठी समुपदेशक अर्चना चिकणे, प्रबंधक पी.एन.रोझतकर, स्वीय सहाय्यक व्ही.जी.जोशी, सह अधिक्षक एच.डी.बडगुजर, सहाय्यक अधिक्षक श्री सपकाळे, श्री भालेराव, श्री बावीस्कर आदींनी परिश्रम घेतले.