एन.जी.शेजवळे : मुक्ताईनगरात शरद बोदडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
मुक्ताईनगर- आज-काल शाळा-महाविद्यालय शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, वकील बनविण्याचे कारखाने बनले आहेत. नैतीक मूल्यांचा र्हास होत असल्याचे चित्र असल्यानेच सभोवताली देशभरात अनेक वाईट कृत्ये घडत आहेत. राष्ट्र मजबूत करायचे असेल तर शिक्षणातून माणूस घडणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मैत्री युवा फाउंडेशन उचंदाचे संस्थापक अध्यक्ष एन.जी.शेजवळे यांनी केले. सुकळी येथील नवीन माध्यमिक विद्यालयांमध्ये आयोजित शिक्षक स्वागत समारंभप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी रामदेवबाबा बहुउद्देशीय संस्थेचे सचिव डॉ.दिलीप पानपाटील होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मैत्री युवा फाउंडेशनचे सचिव दीपक इंगळे यांनी केले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप दाणे, महेंद्र हिरोळे, संतोष झनके, वायला पोलीस पाटील सुनील तायडे, डॉ.मुकेश तायडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात शिक्षकदिनाचे औचित्य साधून दरवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा मैत्री युवा फाउंडेशनतर्फे नवीन माध्यमिक विद्यालय, सुकळी येथील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचार्यांचा फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आदर्श शिक्षक पुरस्कार नवीन माध्यमिक विद्यालय, सुकळी येथील उपशिक्षक शरद मधुकर बोदडे यांना मैत्री युवा फाउंडेशन या संस्थेतर्फे प्रदान करण्यात आला. स्वच्छ भारत मिशनचे समन्वयक गजानन सुरवाडे, डॉ.दिलीप पानपाटील तसेच प्रमोद खिरोडकर, ज्ञानेश्वर पाटील यांना सेवारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन उपशिक्षक शरद चौधरी यांनी तर उपशिक्षक डी.एम.फेगडे यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी उपशिक्षिका वैशाली सोनवणे, राजेंद्र वाघ, विशाल काकडे, मंगेश दांडगे, संदीप पावरा, मयूर सपकाळे तसेच लिपिक नवल कोळी, सतीश सोनोने, अनिल चौधरी आदींनी परीश्रम घेतले.