कल्याण । सायंकाळच्या सुमारास डोंबिवली एमआयडीसी परिसरातील हार्बेट ब्राऊन कंपनीत काही कर्मचारी साफसफाई करीत असताना प्रचंड धुराचे लोट निघू लागले. काही क्षणातच या परिसरात धुराचे साम्राज्य पसरल्याने परिसरात एकच घबराट पसरली. दरम्यान, वर्षभरापूर्वी प्रोबेज कंपनीत घडलेल्या भयानक स्फोटाच्या आठवणी अजून ताज्या असताना या कंपनीतून धूर निघू लागल्याने कर्मचारी व परिसरातील नागरिक घाबरून पळत सुटले. मात्र, कोणतीही गंभीर घटना नसल्याचे निष्पन्न झाल्याने सर्वांनी निःश्वास टाकला. कंपनीतील केमिकल ड्रमचा पाण्याशी संयोग झाल्यामुळे ड्रममधून धूर निघू लागला आणि या ड्रमचा स्फोट झाल्याचे कामगाराकडून सांगण्यात आले. 26 मे 2016 रोजी डोंबिवली एमआयडीसीमधील प्रोबेज कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात कंपनी मालकासह 9 जण जागीच ठार झाले होते.
धुरामुळे धावपळ…
डोंबिवली एमआयडीसीमधील प्रोबेजच्या शेजारील हार्बेट ब्राऊन या कंपनीत काही कर्मचारी साफसफाई करीत असताना प्रचंड धुराचे लोट निघू लागले. काही क्षणातच या परिसरात धुराचे साम्राज्य पसरले. कंपनीतून धूर निघू लागताच परिसरात एकच धावपळ उडाली. गंभीर परिस्थिती पुन्हा उद्भवण्याच्या भीतीमुळेच हातातील काम टाकून कंपनीच्या गेट बाहेर धाव घेतल्याचे कर्मचार्यांनी सांगितले. दरम्यान, हार्बेट ब्राऊन ही कंपनी अनंत आचार्य यांच्या मालकीची असून केमिकल उत्पादन तयार करणार्या या कंपनीतील 80 टक्के कर्मचारी गणेशोत्सवामुळे रजेवर असून 12-13 टक्के कर्मचारी सफाईचे काम करीत होते. यावेळी असिड व पाण्याचा संयोग झाल्यामुळे परिसरात धूर झाला. मात्र इतर कोणतीही हानी व नुकसान झाले नसल्याचा दावाा हार्बेट ब्राऊन कंपनीचे सल्लागार रवींद्र साठे यांनी केला आहे. मात्र धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.