रासायनिक कारखान्यांवरील कारवाईचे आदेश धाब्यावर

0

नवी मुंबई । महापे, पावणे व रबाले येथील नाल्याद्वारे येणार्‍या रासायनिक द्रव्यविरोधात विविध ठिकाणी चर्चा झाली. संबंधित अधिकार्‍यांना कारवाईचे आदेशही देण्यात आले. परंतु, आजतागायत यावर कारवाई झाली नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावर मानवतावादी भूमिका ठेवून प्रदूषण महामंडळाने कारवाई करावी, अशी मागणी जनकल्याण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश शर्मा यांनी केली आहे.

दरम्यान, संध्या नाल्यालगत वास्तव्य करणार्‍या शिशू व वृद्धाना रासायनिक द्रव्याच्या वासामुळे गंभीर आजार जडल्याचे समोर आले आहे. रबाले, महापे व पावणे औद्योगिक क्षेत्रामध्ये असणार्‍या रासायनिक कारखान्यातून सातत्याने रासायनिक द्रव्ये सोडले जात आहे. या रासायनिक द्रव्याच्या वासामुळे नागरिकांना श्‍वास घेण्यास अडचणी येत असल्याची माहिती वृद्ध तुकाराम वाकुंडे यांनी दिली तसेच पांढरे, काळे, लाल, राखाडी, हिरवे अशा प्रकारच्या येणार्‍या रासायनिक द्रव्यामुळे नाल्यालगत असणार्‍या वृक्ष, वनस्पती, जैविक जीव तसेच मासेमारीवर संकट आल्याची माहिती शामराव पाटील यांनी दिली. घणसोली नाल्यालगत असणार्‍या खारेश्‍वर उद्यानात असताना रासायनिक द्रव्यामुळे श्‍वास घेण्यास नकोसे होत असल्याचे भिकू बैले या वृद्धांनी सांगितले. नाल्यातून रासायनिक द्रव्ये सोडणार्‍या कारखान्यावर कारवाई करावी म्हणून गेल्या आठ वर्षांपासून विद्यमान नगरसेवक प्रशांत पाटील, स्व. माजी नगरसेवक संजय पाटील यांनी प्रयत्न केले होते. प्रदूषण महामंडळाच्या अधिकारी नाल्यावर हजेरी लावण्याव्यतिरिक्त काहीही केले नसल्याचे जनकल्याण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश शर्मा यांनी सांगितले.

याबाबत पर्यावरण समिती सभापती दिव्या गायकवाड यांना विचारले असता आम्ही स्वतः पर्यावरण सचिव यांना तक्रार केली आहे. त्यांनी तत्काळ नवी मुंबई प्रदूषण महामंडळाचे अधिकारी अनिल मोहेंकर योग्य काम करत नाही म्हणून बदली केली तसेच आता जे नवीन अधिकारी आलेले अनंत हर्षवर्धन काय कारवाई करतात, याकडे आमचे लक्ष आहे तसेच औद्योगिक महामंडळ बरोबर आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे. यासंदर्भात प्रादेशिक प्रदूषण महामंडळाचे अधिकारी अनंत हर्षवर्धन यांच्या कार्यालयात संपर्क साधला असता, ते दवाखान्यात अ‍ॅडमिट असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया होऊ शकली नाही. त्यानंतर 2017 मध्ये पर्यावरण समिती सभापतीपदी दिव्या गायकवाड यांची निवड झाल्यानंतर त्यांनी ह्या समस्यांवर जोर दिला. त्यानंतर त्याची दखल घेत आमदार संदीप नाईक यांनी हिवाळी अधिवेशनात रासायनिक कारखान्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी कारवाई करण्याचे आदेशही दिले. परंतु, आजही रासायनिक द्रव्य सोडणे तसूभरही कमी झाले नसल्याचे वास्तव असल्याचे राजेश शर्मा यांनी सांगितले.

रासायनिक द्रव्य पूर्णपणे बंद होणे ही काळाची गरज
प्रसिद्ध जल तज्ज्ञ राजेंद्र सिंग यांच्या म्हणण्या नुसार, ज्या ठिकाणाहून रासायनिक द्रव्य जाते, त्याठिकाणी वास्तव्य करणाऱया नागरिकांना कर्क रोग सारखा महाभयंकर रोग होण्याची दाट शक्यता असते. तसेच नवजात शिशूंनासुद्धा श्‍वसनाचे आजार होण्याची दाट शक्यता असते. सध्या त्यांचा अंदाज महापे, पावणे, घणसोली परिसरातील नागरिकांना होत असल्याचे शामराव पाटील यांनी सांगितले. त्यामुळे रासायनिक द्रव्य पूर्णपणे बंद होणे, ही काळाची गरज असल्याचे जनकल्याण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश शर्मा यांनी सांगितले.