युरिया वगळता कॉम्पलेक्स खतांमध्ये 300 ते 400 रुपयांपर्यंत वाढ
पुणे : नवीन वर्षाच्या सुरवातीलाच मोदी सरकारने अनुदानित खतांच्या किंमतीत मोठी वाढ करून ऐन दुष्काळात शेतकर्यांना मोठा झटका दिला आहे. सततची नापीकी, कांद्याचे पडलेले बाजारभाव, उसाला एफआरपी नाही, रखडलेली कर्जमाफी यामध्ये बळीराजा पुरता भरडला जात असतानाच खतांच्या गतवर्षीच्या तुलनेत युरिया वगळता कॉम्पलेक्स खतांमध्ये 300 ते 400 रुपयांपर्यंत वाढ केली आहे.
जिल्ह्यात यंदा पर्जन्यमान कमी असल्याने दुष्काळी यादीतील तालुक्यांची संख्या वाढली आहे. हवामानाचा लहरीपणा त्यातच कोणत्याच पीकाला हमी भाव नसल्याने शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. पेरण्याचे क्षेत्रही या हंगामामध्ये घटले आहे. पीके जगविण्याची कसरत सुरू असतानाच खातांच्या किंमती वाढल्याने शेतकर्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
शेतकर्यांमध्ये नाराजी
इंधनाच्या किमतींसोबत ही वाढ होत असे परंतु, त्यातून खर्चात काही मोठा फरक होत नव्हता. इंधन शंभरीपार जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्याचा परिणाम आता खतांच्या किंमतीवरही होऊ लागला आहे. यामुळे आधीच बळीराजा संकटात सापडलेला असताना आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरच सरकारने दिलासा देण्याऐवजी खतांची दरवाढ केल्याने शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे. याचा परिणाम बाजारपेठेवरही होऊ लागली आहे.
इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला
खतांसाठी आवश्यक असणार्या मॅग्नेशियमचा पुरवठा तामिळनाडूतून होतो. तामिळनाडूतील खाणीतून मॅग्नेशियमचा तुटवडा सुरु आहे, त्यामुळे नत्र आणि सुपरफास्ट रसायने आयात करावी लागत आहेत. भारतासोबत अन्य देशांकडूनही या रसायनांना अचानक मागणी वाढली आहे. त्यातच खत निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या फॉस्फेटच्याही किंमतीतही वाढ झाली आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतुकदारांनी वाहतूक खर्चात वाढ केली आहे. त्यामुळे खत कंपन्यांनाही खताच्या किंमतीत वाढ केली आहे.