रासायनिक खते विक्रीबाबत तालुकास्तरीय प्रशिक्षण वर्ग

0

शिरपूर। खत अनुदान रक्कम कंपन्यांना थेट हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने अनुदान वितरीत करण्याच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून दि.4 मे रोजी पंचायत समिती, शिरपूर येथे तालुकास्तरीय प्रशिक्षण संपन्न झाले. राज्यात 1 जून पासून शेतकर्‍यांना अनुदानित रासायनिक खतांची विक्री ही पीओएस (पॉईंट ऑफ सेल) मशिनद्वारे करणे अनिवार्य आहे. त्याकरीता शेतकर्‍यांना आपला आधारकार्ड क्रमांक व अंगठ्याचा ठसा या आधारे खताचे वितरण बंधनकारक असणार आहे.

पीओएस मशिन वापराबाबत प्रशिक्षण
या प्रणालीचा वापर अनुदान वितरणासाठी सुसूत्रता आणण्यास व खताचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रभावी ठरू शकतो. त्यामुळे या प्रणालीच्या वापराबाबत तालुकास्तरीय रासायनिक खत विक्रीत्यांचे प्रशिक्षण दि. 4 मे 2017 रोजी पंचायत समिती, शिरपूर येथे अमरीशभाई पटेल सभागृहात घेण्यात आले. या प्रशिक्षणाकरीता तालुक्यातील रासायनिक खत विक्रेते यांनी सहभाग घेतला. या प्रशिक्षणास कैलास मोते, विभागीय कृषी सहसंचालक यांनी थेट लाभ हस्तांतरण योजनेबाबत कृषी निविष्ठा नमुने घेण्याबाबत, निविष्ठा विक्री तपासणी, विक्रीपश्‍चायत सेवा, कृषी यांत्रिकीकरण व कृृषी औजारांच्या थेट लाभ हस्तांतरणाबाबत सखोल असे मार्गदर्शन केले.त्यानंतर उपस्थित रासायनिक खत विक्रेत्यांनी पीओएस मशिन वापराबाबत चलचित्रद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी कैलास माते, विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक विभाग, नाशिक तसेच पंचायत समितीचे उपसभापती संजय पाटील, शरद कासार, सहाय्यक गटविकास अधिकारी. युटी.गिरासे, तालुका कृषी अधिकारी, आर.डी.पाटील, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, भरत कोळेकर, कृषी अधिकारी व एन.आर.पाटील, गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक इत्यादी अधिकारी व तालुक्यामधून एकूण 90 रासायनिक खते विक्रेते उपस्थित होते. कार्यक्रमासाठी बी.व्ही.बैसाणे, कृषी विकास अधिकारी, आर.एम.नेतनराव व भरत कोळेकर, कृषि अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले एन.आर.पाटील यांनी उपस्थितांप्रती आभार व्यक्त केले.