शिरपूर । मुंबई – आग्रा महामार्गावरील शिरपूर फाट्यालगत असलेल्या टोल नाक्यांवर शिरपूर व सोनगीर टोल नाक्यावरून ऊस घेवून जाणार्या वाहनांना टोलमाफी मिळावी या मागणीसाठी प्रशासनाला सूचना न देता तसेच जिल्ह्यांत जमावबंदीचा आदेश असतांना त्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी येथील भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, शिवसेना तालुकाध्यक्ष भरतसिंग राजपूत, काँग्रेसचे शहराध्यक्ष तिन गिरासेसह नगरसेवकांविरूद्ध शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
4-5 किलोमीटर पर्यंत रहदारी ठप्प
4 रोजी संध्याकाळच्या सुमारास भाजपा, शिवसेना व काँग्रेस पक्षाकडून शिरपूर टोल नाक्यावर ऊस वाहतूक करणार्या वाहनांना टोल फ्री मिळावा यासाठी 4 तास आंदोलन करण्यात आल्यामुळे दोन्ही बाजुकडून सुमारे 4-5 किमी अंतरावरपर्यंत रहदारी पूर्णतः ठप्प झाली होती. काँग्रेस व भाजपाकडून शिरपूर व सोनगीर टोलनाक्यावर ऊस वाहतूक करणार्या वाहनांना टोल फ्री मिळावा यासाठी वेगवेगळे निवेदन या संदर्भात देण्यात आले. टोलनाका प्रशासनाने 8 रोजीपर्यंत ऊस वाहतूक करणार्यां वाहनांना टोल फ्री केला असून पुन्हा 8 रोजी बैठक होवून या संदर्भात पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
70 ते 80 जणांविरोधात गुन्हा दाखल
4 रोजी काँग्रेस, शिवसेना व भाजपाचे पदाधिकार्यांनी शिरपूर व सोनगीर टोलनाक्यावरून ऊस उत्पादक शेतकर्यांच्या ऊसाच्या वाहनांना टोलमाफी द्यावी या मागणीसाठी तब्बल 3 ते 4 तास रस्ता रोको आंदोलन केले होते. काँग्रेस व भाजपाच्या पदाधिकार्यांनी पोलिस प्रशासनाला कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता आंदोलन केल्यामुळे भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, शिवसेना तालुकाप्रमुख भरतसिंग राजपूत, काँग्रेस शहराध्यक्ष नितीन गिरासे, नगरसेवक राजूअण्णा गिरासे, चंदनसिंग राजपूत, जि.प.चे माजी उपाध्यक्ष के.डी.पाटील, विक्की चौधरी, संजय आसापुरे, महेंद्र पाटील, भालेराव माळी, किशोर माळी, चंद्रकांत पाटील, हेमराज राजपूत यांच्यासह इतर 70-80 जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश
आंदोलनकर्त्यांनी पोलिस प्रशासनाला कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना व गैर कायद्याची मंडळी जमवून ऊस उत्पादक शेतकर्यांच्या ऊसाचे वाहन टोल फ्री करावे या मागणीसाठी वाहतूक ठप्प केली होती. तसेच 24 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2017 या दरम्यान जिल्ह्यात मुंबई पोलिस कायदा कलम 37(1)(3) चे प्रतिबंधात्मक आदेश जारी असतांना सदर ादेशाचे संबंधित राजकीय पदाधिकार्यांकडून उल्लंघन करण्यात आले. याबाबत शिरपूर पोलिस ठाण्याचे हवालदार मुकेश गिलदार पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील सर्व राजकीय पदाधिकार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.