भुसावळ । तालुक्यातील निंभोरा येथील सरपंच शालीक सोनवणे यांची हत्या झाल्याप्रकरणी गावकर्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. मात्र पोलीसांनी मध्यस्थी करुन हे आंदोलन थांबविले होते. यावेळी आरोपींच्या तपासाचे आश्वासन देण्यात आले होते. आता मात्र तब्बल चार दिवसानंतर 26 युवकांवर पोलीसांनी रास्तारोको करण्यासंदर्भात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे. सरपंचाचा खून हा गुन्हा अद्याप पोलीसांकडे नोंद न करता अकस्मात मृत्यूची अद्याप नोंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात येत असल्याने याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.
अद्याप तपास शून्य
मारेकरी बिनधास्तपणे राहून गावकर्यांच्या मनात भिती निर्माण करुन पोलीस आपला धाक दरारा निर्माण करण्याचा प्रयत्न सुध्दा करीत आहे. सात दिवस उलटूनही सरपंचाच्या खुनाचा गुन्हा सुध्दा पोलीसांना दाखल केला नाही. सरपंचाच्या मुलाने गुन्हा दाखल करण्यासाठी बराचवेळ पोलीसस्थानकाच्या चकरा मारल्या. मात्र अद्याप धुळे येथून रिपोर्ट आला नाही याच बाबीवर मुलास फिरवा फिरवीचे उत्तर संबंधित अधिकारी देत आहे. अजून किती दिवस या प्रकरणाला लागेल कधी गुन्हा दाखल होऊन गुन्ह्यातील आरोपींना अटक होईल याची गावकरी वाट पाहत आहे. एकाकडे आरोपी अटकेची वाट पाहता तर दुसरीकडे त्याच गावातील मुलांवर महामार्ग रोखण्याचा गुन्हा दाखल केला जात असल्याचे वृत्त सुत्रांकडून समोर येत आहे. मात्र पाच संशयीतांना ताब्यात घेतल्यानंतरही शोध लागू शकत नसल्याचेही खंत गावकर्यांनी व्यक्त केली.