जळगाव । राजीवगांधी नगरातील युवक राहुल प्रल्हाद सकट यांच्या मारेकर्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या खून खटल्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड.उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी आदी मागण्यांसाठी राजीव गांधीनगरातील मांग गारुडी समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चाची सुरुवात झाली. स्वातंत्र्य चौकमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चाचे नेतृत्व मांग गारुडी समाज युवा संस्थेचे महाराष्ट्र अध्यक्ष अमर कसबे यांनी केले. मोर्चामध्ये पुरूष, युवक, महिलांसह लहान मुलांचाही समावेश होता. आंदोलनकर्त्यांच्या हातात राहुलच्या मारेकर्यांना फाशी द्या, त्याच्या खुनाची सीबीआय चौकशी करा, विनाकारण निष्पाप बळी गेलेल्या राहुलला न्याय द्या, या खून खटल्यात ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची सरकार पक्षातर्फे नेमणूक करा आदी मागण्यांचे फलक होते.
जिल्हाधिकार्यांना निवेदन
महिलांसह लहान मुलेही घोषणा देत होते. गेल्या महिन्यात राहुलवर चॉपरने हल्ला झाला होता. उपचारासाठी मुंबईला नेत असताना नाशिकजवळ त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात मुख्य संशयित सत्यासिंग बावरी याच्यासह रवींद्रसिंग मायासिंग बावरी, मलिंगसिंग मायासिंग बावरी, मालाबाई सत्यासिंग बावरी, कालीबाई सत्यासिंग बावरी यांच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोलिसांनी बॅरिकेड्स लावून त्यांना अडवले. जिल्हाधिकार्यांनी रस्त्यावर येऊन निवेदन स्वीकारावे, या मागणीसाठी आंदोलनकर्ते अडून बसले होते. शेवटी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना निवेदन दिले. राहुलच्या मारेकर्यांना फाशी देण्याच्या मागणीसाठी त्याच्या आईसह नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले. आंदोलनकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर उपोषण मंडपासमोर रस्त्यावर बसले.