येत्या 26 तारखेला नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेत येऊन तीन वर्षे पूर्ण व्हायची आहेत आणि त्यांनी निवडणूक जिंकली त्याला कालच तीन वर्षे पूर्ण झाली. किंबहुना, काल म्हणजे 16 मे रोजी, काँग्रेसचा संसदीय निवडणुकीत लज्जास्पद पराभव झाला, त्याला तीन वर्षे पूर्ण झाली. नेमका तोच मुहूर्त साधून राहुल गांधींना एक गहन प्रश्न पडलेला आहे. तीन वर्षांत मोदी वा भाजप सरकारने असे काय मोठे काम केले, की त्याचा सोहळा साजरा केला जाणार आहे? हा राहुलना पडलेला प्रश्न आहे. आपल्या मनात आलेला प्रश्न व शंका जाहीरपणे मांडण्याचे सौजन्य राहुल दाखवतात, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यांना असा प्रश्न पडला, तर गैर काहीच नाही. किंबहुना, त्यांच्याच प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मोदी सरकारला इतका मोठा सोहळा करावा लागत आहे. सामान्य भारतीय जनता वा मतदाराला मोदी सरकारने तीन वर्षांमध्ये काय केले, ते समजावण्याची काहीही गरज नाही. काय झाले वा काय नाही झाले? त्याची दखल सामान्य जनता वेळोवेळी घेत असते. नुसती त्याची दखल घेत नाही, तर सत्ताधार्यांना पास वा नापासही करून टाकत असते. मोदी सरकारने तीन वर्षांत काय दिवे लावले? त्याचे उत्तर मोदींनी देण्यापेक्षाही सामान्य जनतेने मध्यंतरीच्या अनेक निवडणुका वा मतदानातून दिलेले आहे. राहुल गांधींचे वास्तव्य असलेल्या नवी दिल्ली या महानगरातील महापालिकांचे मतदान गेल्याच महिन्यात पार पड्ले. त्यात लोकांनी मोदींच्याच नावावर भाजपला मतदान केले, असे काँग्रेसच्या प्रवक्त्यांनीच विविध वाहिन्यांच्या चर्चेत सहभागी होताना सांगितले आहे. भाजपने मोदींचाच फोटो लावून पालिकेची सत्ता मिळवली, असे काँग्रेस प्रवक्त्यांना वाटत असेल, तर त्याचाही पत्ता राहुलना लागलेला नाही काय? सोहळा कशाचा हा प्रश्न जाहीरपणे समोर मांडण्यापूर्वी राहुलनी आपल्याच प्रवक्त्यांकडे त्याचे उत्तर मागितले असते, तर काय बिघडले असते?
तीन वर्षांत मोदी वा भाजप सरकारने काय केले? त्याचे उत्तर मागण्यात गैर काहीच नाही. पण जनतेला काय वाटते यापेक्षाही राहुलनिष्ठ काँग्रेसवाल्यांना त्याविषयी काय वाटते? त्याला महत्त्व आहे. अजय माकन वा अन्य काँग्रेसी नेते मोदींच्या नावावर भाजपला मते मिळतात, असे म्हणतात. याचा अर्थ भाजपने काही करून उपयोग नाही. फक्त मोदींचा चेहरा व नाव पुढे केले म्हणजे मते मिळतात, असेच काँग्रेसजनांना वाटते. त्याचा दुसरा अर्थ राहुलना पुढे करून वा त्यांचा चेहरा झळकवून लोक पक्षाला मते देत नाहीत, असाही निघतो. राहुलना खरे तर तो प्रश्न पडायला हवा. भले माझ्या व मोदींच्या चेहर्यात असा काय मोठा फरक आहे? लोक मोदींना कशासाठी मते देतात आणि राहुलना कशासाठी मते नाकारतात? हा प्रश्न राहुलना पडला पाहिजे. तीन वर्षांपूर्वी लोकसभेचे निकाल लागल्यापासून राहुलना असा प्रश्न पडणे आवश्यक होते. तो पडला असता, तर कदाचित आतापर्यंत पक्षाच्या प्रकृतीमध्ये काहीतरी सुधारणा झाली असती. पण अजून काँग्रेसच्या या उपाध्यक्षाला मोदींना लोक कशाला मते देतात? असा प्रश्नच पडलेला नाही. किंबहुना, आपल्याला लोक कशामुळे मते द्यायला राजी नाहीत, असाही आवश्यक प्रश्न त्यांना पडलेला नाही. तिथे सगळा घोळ आहे. निरुपयोगी प्रश्न राहुलना पडतात आणि ते त्याच प्रश्नांची उत्तरे शोधत बसल्याने पक्षाचे दुर्दैव ओढवले आहे. तीन वर्षे उलटून गेली, तरीही आपल्याला लोकांनी कशामुळे नाकारले आहे? त्याचा शोधही घेण्याचा विचार राहुल वा त्यांच्या निकटवर्तीयांना सुचलेला नाही. मग त्याचे उत्तर कुठून मिळायचे? त्यानुसार पुढली वाटचाल कधी सुरू व्हायची? काँग्रेसचा गाडा म्हणूनच तिथेच 2014 मध्ये अडकून पडला आहे. काय चुकले तेच चुकले, असे वाटले नाही व सुधारले नाही, तर चुकांचीच पुनरावृत्ती होत रहाते आणि पराभवाचीही पुनरावृत्ती अपरिहार्य होऊन जाते.
मागल्या तीन वर्षांत मोदी वा भाजपा सरकारने काय केले? असा प्रश्न इतरांनी व जनतेने नक्कीच विचारला पाहिजे. कारण त्यांनी या पक्षाला इतकी मते दिली आहेत आणि बहुमतही दिलेले आहे. साहजिकच त्यांच्या अपेक्षांचे काय झाले? हा प्रश्न सामान्य माणसाला विचारण्याचा नक्कीच अधिकार असतो. पण ज्यांनी मोदींना मतेच देऊ नका असे जनतेला बजावले होते, त्यांनी तसा प्रश्न विचारण्याचा विषयच कुठे येतो? राहुलना असे वाटत असेल, की गेल्या तीन वर्षांत या सरकारने काहीच काम केलेले नाही, तर त्याची जंत्री जनतेला सादर करून तिला शहाणे करण्यात पुढाकार घेतला पाहिजे. किंबहुना, त्यांच्याच इशार्यावर आधीच्या दहा वर्षांत चाललेल्या यूपीए सरकारने तुलनेने किती अधिक चांगले काम केलेले होते, त्याचाही गोषवारा राहुलनी लोकांसमोर मांडला पाहिजे. त्यातून जे लोकशिक्षण होईल, तेच लोकांना मोदी किंवा भाजपपासून दूर नेण्यास हातभार लावू शकते आणि पर्यायाने पुन्हा राहुलच्या काँग्रेसला सत्तेत आणण्यास उपयुक्त ठरू शकते. पण तसे राहुल करू शकलेले नाहीत. त्याचेही कारण स्पष्ट आहे. गेल्या तीन वर्षांत यूपीएच्या दर्जाचे कुठलेही कर्तृत्व मोदी सरकार दाखवू शकलेले नाही. यूपीएच्या कालखंडात हजारो कोटी रुपयांचे घोटाळे व अफरातफरी राजरोस होत राहिल्या. त्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप करून तो भ्रष्टाचार रोखण्याचा पराक्रम राहुल करू शकले नाहीत. म्हणून तर वैतागलेल्या मतदाराने त्यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत पुरते नामोहरम करून टाकले. सहाजिकच तुलना करायला गेल्यास मोदी सरकारला कुठलाही नजरेत भरणारा भ्रष्टाचार घोटाळा करता आलेला नाही. पर्यायाने सरकार म्हणून जे घोटाळे करायचे असतात, त्यातले काही मोदी सरकारला साधलेले नाहीत, असे राहुलना म्हणायचे असावे. कुठलाही घोटाळा अफरातफर केली नसेल, तर साजरे काय करता, हा सवाल बहुधा त्याच समजुतीतून आला असावा.
राहुल वा त्यांच्या काँग्रेसने मागल्या सत्तर वर्षांत सतत घोटाळे व भ्रष्टाचार केलेला आहे. अगदी आरंभीच्या नेहरू राजवटीपासून घोटाळे व भानगडी हा काँग्रेसी सत्तेचा कारभार राहिलेला आहे. त्याबाबतीत मोदी सरकारला कुठलेही कर्तृत्व दाखवता आले नाही. तीन वर्षांत मोदी सरकारचा कोणी मंत्री वा खुद्द पंतप्रधान कुठल्याही आर्थिक भानगडीत अडकल्याचा आरोप होऊ शकला नाही. तसे तपशील अजून कोणी बाहेर आणू शकलेला नाही. मग सरकार कशाला चालवायचे? निवडणुका जिंकून सत्ता कशाला मिळवायची? मोदी आपल्या कुणा कुटुंबीयाला कुठले ठेके देऊ शकले नाहीत वा कुणा आप्तस्वकीयांना सत्तेचे लाभ देताना दिसले नाहीत. मग त्यांनी सरकार बनवण्याचा अट्टाहास कशाला केला? सरकारी तिजोरी लुटायची नसेल व सत्तेच्या अधिकारात आपली तुंबडी भरून घ्यायची नसेल, तर सरकार म्हणून नेमके करायचे काय असते? राहुलना बहुधा हेच प्रश्न सतावत असतील. कारण त्यांनी बालपणापासून देशाच्या सत्ताकेंद्राच्या नजीक राहून, असेच काही सातत्याने घडताना अनुभवलेले आहे. तसे आरोप ऐकले आहेत आणि त्याचे खुलासे देताना आपल्या पूर्वजांना ऐकले आहे. पण, मोदी त्यापैकी काहीही करताना दिसत नसतील, तर राहुलना मोदींच्या सत्तेविषयी वा सरकारच्या कार्यशैलीविषयी शंका येणे स्वाभाविक नाही काय? जनहित व लोकहितासाठी सत्ता राबवायची तर सरकार बनवायचा आटापिटा कशाला? हा राहुलना पडलेला खरा गहन प्रश्न असणार, यात शंका नाही. आपल्या वा आप्तस्वकीयांच्या खिशात चार दमडे पडले नसतील, तर मोदी सत्तेत येण्याचा तीन वर्षीय सोहळा कशासाठी साजरा करीत आहेत? राहुलना प्रामाणिकपणे सतावणारा हा प्रश्न असू शकतो. कारण जनतेसाठी व लोकहितासाठी सत्ता ही गोष्टच त्यांनी कधी ऐकली नाही किंवा जवळून बघितलेली नाही. मग मोदी काय साजरे करीत आहेत?