नवी दिल्ली : अगदी अपेक्षेप्रमाणे खासदार राहुल गांधी यांची काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 16 डिसेंबरला सकाळी 11 वाजता राहुल अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेणार आहेत. तब्बल 19 वर्षानंतर काँग्रेस पक्षाला नवीन अध्यक्ष मिळाले असून, सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये ही औपचारिक घोषणा करण्यात आली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसमधून फक्त राहुल गांधी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आला होता. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर राहुल यांच्या नावावर अध्यक्षपदाची मोहोर लागली. काँग्रेस निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मलापल्ली रामचंद्रन यांनी राहुल यांच्या नावाची घोषणा केली. राहुल हे नेहरू-गांधी कुटुंबामधून आलेले काँग्रेसचे सहावे अध्यक्ष आहेत. काँग्रेस पक्षाच्या इतिहासामध्ये सोनिया गांधी यांनी सर्वाधिक काळ सलग पक्षाध्यक्षपद भूषविले आहे. याआधी नेहरू-गांधी कुटुंबातील मोतिलाल नेहरू, पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते.
देशभरातील पक्षनेत्यांसोबत बैठका
पक्षाच्या निवडणूक कार्यक्रमात मतदानासाठी 16 डिसेंबरची तारीख आहे. पण अध्यक्षपदासाठी राहुल गांधी हेच एकमेव उमेदवार उभे असल्याने मतदानच होणार नाही. विशेष म्हणजे, अध्यक्षपदासाठी राहुल यांच्या समर्थनार्थ निवडणूक अधिकार्याला 89 नामांकनपत्रे मिळाली होती. पडताळणीत सर्व नामांकनपत्रे योग्य निघाली होती. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. ती संपल्याने अध्यक्ष म्हणून राहुल गांधी हेच एकमेव उमेदवार असल्याने त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. 16 डिसेंबरला सोनियांकडून औपचारिकपणे कार्यभार स्वीकारल्यानंतर ते देशभरातील पक्षनेत्यांसोबत बैठका घेणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.
पक्षसंघटना, कार्यकारिणीत बदलाची शक्यता
काँग्रेस पक्षाची सुत्रे स्वीकारल्यानंतर राहुल गांधी पक्षात अनेक फेरबदल करण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून ते नवीन टीम बनविण्याच्या तयारीत आहेत. काही जुन्या नेत्यांनी त्यास विरोधही केला होता. पक्षाध्यक्ष झाल्यानंतर राहुल सर्व निर्णय स्वत:च घेतील. काँग्रेस कार्यकारिणीतही ते बदल करतील, असे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड होण्याचे संकेत मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याची दखल घेत टीका केली होती. तरूण नेते असलेले राहुल हे भविष्यात मोदींना आव्हान उभे करू शकतात, या शक्यतेमुळेच मोदींनी त्यांच्या निवडीची दखल घेतल्याचे दिसून आले. काँग्रेस पक्ष नव्हे, जहागिरी आहे, असे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना वाटते. त्यांचे कोणत्याही सत्तेत येणे म्हणून राजाचा वारस सत्तेत आल्यासारखे आहे. हे औरंगजेबराज त्यांना लखलाभ, असे म्हणत मोदींनी राहुल यांच्यावर टीका केली होती.
132 वर्षांतील साठावे पक्षाध्यक्ष
काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविणारे राहुल गांधी हे नेहरू-गांधी कुटुंबातील सहावे सदस्य तर काँग्रेसचे 60 वे सदस्य असतील. सोनिया गांधी यांच्याकडून ते अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. सोनियांनी सर्वाधिक 19 वर्षे पक्षाध्यक्षपद सांभाळले आहे. गांधी कुटुंबात सर्वाधिक काळ खासदार राहिल्यानंतर राहुल यांच्याकडे आता ही जबाबदारी येत आहे. यापूर्वी इंदिरा गांधींची 1959 मध्ये काँग्रेस अध्यक्षा म्हणून निवड झाली होती; परंतु त्या 1967 मध्ये खासदार प्रथमच बनल्या. याशिवाय, राजीव गांधी 1981 मध्ये खासदार, तर 1985 मध्ये अध्यक्ष बनले. सोनिया गांधी 1998 मध्ये अध्यक्ष बनल्या, तर 1999 मध्ये प्रथम लोकसभेवर निवडून आल्या होत्या.
2019मधील निवडणुकांची जबाबदारी
2019च्या लोकसभा निवडणुकांची जबाबदारी आता राहुल गांधी यांच्या खांद्यावर असणार आहे. या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करू शकते. तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वी 12 राज्यांत निवडणुका आहेत. यात लोकसभेची रंगीत तालीम असणार असून, राहुल यांच्या नेतृत्वाचा यावेळी कस लागणार आहे. सोनिया गांधी सातत्याने आजारी असल्याने यापुढे सर्वच जबाबदारी राहुल गांधी यांना पार पाडावी लागणार आहे. राहुल हे 2014च्या लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसची हिंदूविरोधी प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच मुस्लीम तुष्टीकरणाचे व बहुसंख्याकांच्या उपेक्षेचे लेबल हटवण्यासाठीही त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसते. 2014 मध्ये उत्तराखंडपासून राहुलनी प्रचाराला सुरुवात केली होती. त्या वेळी ते केदारनाथाच्या दर्शनाला गेले होते. तेव्हापासून ते ज्या राज्यात प्रचारासाठी जातात, तेथील मंदिरांमध्ये दर्शन घेत आहेत.