लखनौ | उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी राहुल गांधी-अखिलेश यादव ही जोडी सर्व तयारीसह मैदानात उतरली आहे. शनिवारी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचा संयुक्त जहिरनामा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी प्रसिध्द केला. सत्ता आल्यानंतर युवकांना मोफत स्मार्टफोन, वीस लाख युवकांना रोजगाराची हमी, शेतकर्यांनी कर्जमाफी आदि दहा मोठी आश्वासने त्यांनी दिली.
मुलींना मोफत सायकल
काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने संयुक्तपणे प्रसिध्द केलेल्या या जाहीरनाम्यात राज्यातील नागरिकांना मोठी आश्वासने दिली आहेत. एक कोटी गरिब कुटूंबांना दर महिना 1 हजार रूपये पेन्शन दिली जाईल, शहरी भागातील गरिबांना 10 रूपयात जेवण उपलब्ध करून दिले जाईल, सरकारी नोकर्यांमध्ये महिल्यांना 33 टक्के आरक्षण तर पन्नास टक्के आरक्षण ग्रामपंचायत आणि पंचायत समिती पातळीवरील स्थानिक समित्यांच्या निवडणूकीत देण्यात येणार, पुढील पाच वर्षात प्रत्येक ग्रामीण भागाला वीज, पाणी आणि रस्ते देणार, अशी आश्वासने या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत. काँग्रेस, समाजवादी पक्षाचे सरकार आल्यानंतर हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. 9 वी ते 12 वीच्या सर्व विद्यार्थीनींना मोफत सायकल, 10 लाख गरिब, मागासवर्गीयांना मोफत घरे, सहा मोठ्या शहरांशी गावांना जोडण्यासाठी चौपदरी रस्ते इत्यादी आश्वासने या आघाडीने दिली आहेत.
मन की नको, काम की बात करा
यावेळी अखिलेश यादव म्हणाले, शेवटी समाजवादी पक्षाने त्यांच्या म्हणण्याला प्रत्यक्ष आकार दिला आहे. पण काही लोक केवळ मन की बात करतात आणि काम की बात करत नाहीत, असा टोला त्यांनी नाव न घेता मोदी यांना लगावला. ते, युपीसाठी काय करणार, हे बोलतच नाहीत. ते म्हणतात निवडणुकीसाठी दोन कुटूंबांची आघाडी झाली आहे. पण आम्ही म्हणतो दोन युवक एकत्र आले आहेत ते म्हणजे काँग्रेस आणि समाजवादी पक्ष होय. आम्ही राज्याच्या विकासासाठी आखलेल्या या कार्यक्रमावर आमचे सरकार आल्यानंतर अंमलबजावणीस सुरवात करू, असेही अखिलेश म्हणाले.
मोदींना दुसर्यांच्या बाथरूममध्ये डोकावण्याची सवय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर केलेल्या वक्तव्याला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुसर्यांच्या बाथरुममध्ये डोकावून पाहण्याची सवयच आहे. मोदींना लोकांच्या जन्मपत्रिका पाहण्याचा पण छंद आहे. त्यांना गुगलचा वापर कसा करायचा हे देखील माहित आहे, टीका राहुल गांधी यांनी केली. जाहीरनामा प्रसिध्द केल्यानंतर घेतलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.
त्या टीकेला दिले उत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे प्रचार सभेत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर जोरदार टीका केली होती. काँग्रेसचा एक नेता पोरकटपणा करत आहे. पक्षातील नेतेच त्याचे काही ऐकत नाही, असा अप्रत्यक्ष टोला मोदी यांनी राहुल गांधी यांना लगावला होता. जर तुम्ही गुगलवर जाऊन पाहिले तर या नेत्यावर केवळ जोक्स आणि मेमेज दिसतील असे मोदी म्हणाले होते. त्यामुळेच मोदी यांना गुगलचा वापर करता येतो असा टोला राहुल यांनी लगावला. राहुल यांच्यापासून त्यांच्याच पक्षातील नेते दूर पळतात परंतु अशा नेत्यांना अखिलेश यांनी जवळ केले आहे, असे मोदी म्हणाले होते.