राहुल आवारेने संदीप तोमरला लोळवले

0

नवी दिल्ली : महाराष्ट्राचा पैलवान राहुल आवारेने रिओ ऑलिम्पिकसाठीच्या निवडीत त्याच्यावर झालेल्या अन्यायाचा हिशेब चुकता करत प्रो रेसलिंग लीगमधल्या 57 किलोच्या लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी संदीप तोमरचा 14-5 असा तब्बल नऊ गुणांनी पराभव केला. लढतीच्या पहिल्या राऊंडमध्ये संदीपने 3-0 अशी आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या राऊंडमध्ये राहुलने आक्रमक खेळ करून 14 गुणांची घसघशीत कमाई केली. हीच कमाई राहुलला तांत्रिकदृष्ट्या निर्विवाद विजय देणारी ठरली.

१४-५ ने दणदणीत विजयी
रिओ ऑलिम्पिकमधल्या 57 किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्त्व कुणी करायचे यासाठी चुरस होती. पण भारतीय कुस्ती महासंघाने त्या वेळी निवड चाचणी न घेताच संदीप तोमरला रिओचे तिकीट दिले होते. भारतीय महासंघाकडून झालेल्या त्याच अन्यायाचा हिशेब, राहुलने संदीपला हरवून चुकता केला. मुंबई महारथी संघाकडून खेळणारा महाराष्ट्राचा आवडता मल्ल पै.राहुल आवारे विरुद्ध हरियाणा हॅमर्स संघाचा पै.संदीप तोमर ही कुस्ती झाली. यात राहुलने संदीपला आसमान दाखवत १४-५ ने विजय मिळवला. मुंबई महारथीच्या राहुलने खेळाच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला होता. मात्र पहिल्या 3 मिनिटात राहुल ३-० गुणांनी मागे होता. सर्वाना वाटत होते राहुलचा पराभव होणार. मात्र सामन्याच्या उर्वरित ३ मिनिटात पट काढून राहुलने संदीपला खाली धरून मोळी बांधली आणि तब्बल १० गुण मिळवून १४-५ ने दणदणीत विजयी मिळवला.