पिंपरी-चिंचवड : महापालिकांच्या विषय समित्यांमध्ये कोणते विषय मंजूर करायचे आणि नाकारायचे हे ठरविण्याचे त्या त्या सभेला अधिकार आहेत. एवढा साधा आणि सोपा कायदा माहित नसणारे शिवसेना गटनेते व शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी ऐनवेळचे विषय घेतल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा देऊन स्वतःच्या अकलेचे तारे तोडले आहेत. त्याचप्रमाणे भाजपचे लोक शिवसेनेला घाबरतात, असे म्हणत स्वतःची बौद्धिक दिवाळखोरीही कलाटे यांनी जाहीर केली आहे, असे जोरदार प्रत्युत्तर भाजप नगरसेवक व स्थायी समिती सदस्य हर्षल ढोरे यांनी दिले आहे. महापालिकेतील अधिकारी व पदाधिकार्यांना प्रस्ताव मंजुरीसाठी अश्लिल भाषेत शिवीगाळ करण्याची कलाटे यांची ही कोणती लोकशाही आहे, असा सवालही ढोरे यांनी केला आहे.
कलाटेंनी दिला होता इशारा
कलाटे यांनी महापालिकेच्या विषय समित्यांमध्ये ऐनवेळचे विषय घेतल्यास न्यायालयात जाण्याचा आणि आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच भाजपचे लोक शिवसेनेला घाबरत असल्याचेही कलाटे यांनी म्हटले आहे. त्याला भाजप नगरसेवक व स्थायी समिती सदस्य हर्षल ढोरे यांनी प्रत्युत्तर देत अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या जी अवस्था झाली, त्याची आठवण करून दिली आहे.
कलाटेंनी न्यायालयात जावेच
ढोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासन, पदाधिकारी, विषय समित्या या सर्वांचे कायदेशीर अधिकार निश्चित करण्यात आले आहेत. विषय समित्यांमध्ये एखादा विषय नाकारायचा की मंजूर करायचा किंवा ऐनवेळचे विषय घ्यायचे की नाही, हे ठरविण्याचा अधिकार त्या त्या सभेच्या सभापतींना आहेत. एवढा साधा आणि सोपा कायदा माहित नसणारे कलाटे यांनी या मुद्द्यावर न्यायालयात जाण्याचा इशारा देऊन स्वतःच्या अकलेचे तारे तोडले आहेत. त्यांच्यात एवढी हिंमत असेल, तर त्यांनी या मुद्द्यावर न्यायालयात जावे आणि तोंडघशी पडणे म्हणजे काय असते, याचा एकदा अनुभव घ्यावाच.
भाजप सहन करणार नाही
भाजपचे लोक शिवसेनेला घाबरत असल्याचे म्हणत कलाटे यांनी स्वतःची बौद्धिक दिवाळखोरीही जाहीर केली आहे. त्यांच्या या टिकेमुळे शहरातील राजकीय वर्तुळात हास्यास्पद प्रतिक्रिया उमटत आहेत. अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत काय झाले, हे विसरण्यासाठी तेभाजपवर अशा प्रकारची विनोदी टिका करत आहेत. त्यामुळे आपणाला स्वस्तात प्रसिद्धी मिळते, असा कलाटे यांचा समज झालेला दिसत आहे. शहरातील जनतेने भाजपला महापालिकेत एकहाती सत्ता दिली आहे, याचे भान राहुल कलाटे यांनी ठेवावे. पक्षीय राजकारणात संवादाला महत्त्व असते. हा संवाद न साधता केवळ दादागिरी करून आपणाला हवे तसेच झाले पाहिजे या भावनेतून कलाटे वागत असतील, तर भाजप कदापीही ते सहन घेणार नाही, असा इशारा ढोरे यांनी दिला आहे.