नवी दिल्ली – राफेल विमान करारावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. हिंदुस्थान एअरोनॉटिक्सला (एचएएल) देण्यात आलेल्या १ लाख कोटींच्या काँट्रॅक्टच्या सत्यतेवर राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नचिन्हाला प्रत्युत्तर देताना निर्मला सीतारमन यांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे लोकसभेत सांगितले. राहुल गांधी हे संपूर्ण देशाची दिशाभूल करत आहे असे आरोप देखील संरक्षण मंत्र्यांनी केले.
सरकारने एचएएलला एक लाख कोटी रुपयांचे काँन्ट्रॅक्ट दिले आहे. हे काँन्ट्रॅक्ट २०१४-१८ या कालाधीसाठी आहे. दरम्यान, निर्मला सीतारमन यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर राहुल गांधी यांनी एचएएलमधील कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न उपस्थित केला आहे.
राहुल गांधी यांनी एचएएलला दिलेल्या काँन्ट्रॅक्टबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर निर्मला सीतारमन यांनी लोकसभेत त्याबाबत स्पष्टीकरण दिले. दरम्यान, लोकसभेतील काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही एचएएलवरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, जर एचएएलशी करार झाले आहेत. तर कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी त्यांच्याकडे का पैसे नाहीत, असा सवाल त्यांनी केला आहे.