राहुल गांधींचे भासमान बाहुबल!

0

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 6 दशके भारताची सत्ता काँग्रेसकडे; त्यातही बहुतांश काळ नेहरू आणि गांधी परिवाराकडे होती. या सत्ताकाळात ज्या पद्धतीने राज्यकारभार हाकला गेला. त्यामुळे देशाची सर्वच स्तरांवर अवनती झाली. कृषी, शिक्षण, उद्योग असे कोणतेच क्षेत्र त्याला अपवाद नव्हते. कुठलेच धोरण धड नसल्याने ना शेतकरी समाधानी झाला ना चाकरदार व्यक्ती, ना स्वदेशी उद्योजक व्यक्ती समृद्ध झाली! या संपूर्ण सत्ताकाळात मुस्लीम अनुनय आणि हिंदू दमन ही मोहनदास गांधी यांच्यापासून प्रारंभ झालेली वृत्ती काँग्रेसने निष्ठेने जोपासली. या सर्वांचे एकत्रित परिणाम वर्ष 2014 नंतर दिसू लागले. वर्ष 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सपाटून मार खाल्ला. निवडणुकांमधून काँग्रेसचे शक्तीहीनतेचे सार्वत्रिक प्रदर्शन चालू असताना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना मात्र शक्तीचे भास होत आहेत. राजस्थानमध्ये नुकत्याच झालेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये त्यांनी त्याचा प्रत्यय दिला. त्या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीचा द्वेषही प्रकट केला.

राजस्थानमध्ये शेतकर्‍यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, आम्ही इंग्रजांसमोर मान झुकवणार्‍या सावरकरांसारखे कमजोर (शक्तीहीन) नाही. काँग्रेसच्या लोकांनी भाजपला घाबरण्याची आवश्यकता नाही. जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर स्वतःची कारागृहातून सुटका होण्यासाठी इंग्रजांना चिठ्ठी लिहीत होते, तेव्हा काँग्रेसचे नेते लाठी खात होते. राहुल गांधी यांच्या या विधानांमध्ये तथ्याचा अंशही नाही. जर काँग्रेस कमजोर नव्हती, तर गेल्या 60 वर्षांत भारत कमजोर का झाला? शेतकर्‍यांच्या आत्महत्या का वाढल्या? याचे महत्त्वाचे कारण म्हणजे काही अपवाद वगळता काँग्रेसींनी राष्ट्राची नाही, तर स्वतःची आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रहिताशी, नागरिकांच्या हिताशी तडजोड करून स्वतःचे घराणे समृद्ध करण्याचा प्रयत्न केला.

राहुल गांधी यांचे वक्तव्य म्हणजे काजव्याने सूर्यप्रकाशाला हिणवण्यासारखे आहे. शेतकरी मेळाव्यामध्ये कोणताही संबंध नसताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर चिखलफेक करून राहुल गांधी त्यांच्या बेजबाबदारपणावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले. काँग्रेस मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजांना लिहिलेल्या कुठल्या तरी एका चिठ्ठीवरून त्यांना खलनायक ठरवत आहे. खरे तर कारागृहातून सुटका करून घेण्यासाठी म्हणून लिहिलेल्या पत्रामध्ये इंग्रजांशी दोस्ती नव्हती, तर गनिमी कावा होता. ध्येयपूर्तीसाठीच्या खेळीमधली ती एक खेळी होती. कारागृहात राहून राष्ट्रकार्य आणि जागृती करण्याला मर्यादा येतात. त्यापेक्षा येथून सुटका करून घेतली, तर ते कार्य अधिक जोमाने करता येईल, हा विचार त्यामागे होता. मात्र, ज्या गांधी परिवाराला देशहित समजत नाही, त्यांना देशहितासाठी खेळलेली फसवी खेळी आणि गनिमी कावा कसा कळणार? उद्या राहुल गांधी छत्रपती शिवाजी महाराज यांनी तहात काही किल्ले परत दिले; म्हणून ते कमजोर होते, असे म्हणायलाही कमी करणार नाहीत. जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर फाळणी न होता भारत अखंड राहावा, असे सांगत होते, तेव्हा गांधी आणि नेहरू फाळणीच्या वाटाघाटी करत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर शस्त्रसज्जता आणि देशाच्या सीमा निश्‍चित करण्यास सांगत होते, तर नेहरू भारताचा हिमाच्छादित प्रदेश चीनने घेतला म्हणून काय झाले? तेथे गवताचे पातेही उगवत नाही, असे म्हणून त्यांच्या देशप्रेमाची पातळी दाखवत होते. जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर अहिंदू म्हणून मला इंद्रपद बहाल केले, तरी ते मी नाकारेन आणि शेवटचा हिंदू म्हणून मरेन असे सांगत होते, तेव्हा जवाहरलाल नेहरू मी केवळ अपघाताने हिंदू आहे, असे म्हणत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पर्यायाने हिंदुत्व अन् राष्ट्रीयत्व यांचा दुःसह हेच काँग्रेसच्या पराभवाचे खरे कारण आहे. त्यापासून शिकण्यास काँग्रेसवाले मात्र अजूनही सिद्ध नाहीत, हेच राहुल गांधी यांच्या वक्तव्यातून दिसून येते. जे शिकत नाहीत, ते काळाच्या प्रवाहाबरोबर टिकू शकत नाहीत. राहुल गांधी यांना वीर सावरकरांच्या कमजोरीचे आणि काँग्रेसच्या सक्षमतेचे भास होणे, हे त्याचेच लक्षण आहे.

– अभय वर्तक
प्रवक्ता, सनातन संस्था
7775858387
abhayvartak@gmail.com