नवी दिल्ली:कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे काल अमेठीत ‘रोड शो’ करत असतांना त्यांच्या चेहऱ्यावर कोणी तरी लेझर लाईट मारत होते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. याबाबत कॉंग्रेसने गृहमंत्रालयाकडे तक्रारही केली होती. दरम्यान गृहमंत्रालयाने याची चौकशी करत याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. लेझर लाईटची व्हिडिओ क्लिप बारकाईने तपासल्यानंतर ती हिरवी लेझर लाईट अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या फोटोग्राफरच्या मोबाइलच्या कॅमेऱ्याचा असल्याचे समोर आले. राहुल गांधी यांच्या जीवाला कोणताही धोका नाही असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
बुधवारी अमेठीत प्रचारादरम्यान, राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर अनेकदा हिरव्या रंगाच्या लेझर लाईट मारण्यात आला. ही लेझर लाईट स्नायपर गनची लाईट असावी अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. याचा पुरावा म्हणून काँग्रेसने गृहमंत्रालयाकडे या घटनेचा व्हिडिओ देखील पाठवला. राहुल गांधींनी बुधवारी आपला लोकसभा मतदारसंघ अमेठीत शक्तीप्रदर्शन करीत दोन तास रोड शो केला त्यानंतर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत बहिण काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा, मेव्हणे रॉबर्ट वढेरा आणि त्यांची दोन मुले रेहान आणि मिराया देखील उपस्थित होते. युपीएच्या अध्यक्षा आणि राहुल गांधींच्या आई सोनिया गांधी रोड शोमध्ये सहभागी नव्हत्या. मात्र, त्यांनी राहुल यांचा अर्ज भरतेवेळी उपस्थिती लावली होती.