गांधीनगर : गुजरातमधील बनासकांठा भागात पूरपरिस्थितीची पाहणी करण्यास गेलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांच्या ताफ्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करून हल्ला केल्याची घटना शुक्रवारी घडली. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले, की या हल्ल्यात राहुल गांधी यांच्या वाहनाच्या काचा फुटल्या आहेत. राजस्थानमधील पूरपरिस्थितीची पाहणी करून राहुल हे गुजरात भागात गेले होते. तेथील पूरपीडितांशी चर्चा करून त्यांनी माहिती घेतली. अनेक गावांचा पुरामुळे संपर्क तुटला असून, राजस्थान व गुजरातमधील अनेक जिल्ह्यात हाहाकार उडालेला आहे. राहुल गांधी यांचा दौरा पचनी न पडल्याने स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी दगडफेक करून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तथापि, अशा हल्ल्यांना आपण अजिबात घाबरत नाही. लोकांसाठी धावून जात राहू, अशी प्रतिक्रिया खा. गांधी यांनी या हल्ल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. एका हल्लेखोरास पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
दगडफेक अन् मोदी-मोदीचे नारे!
अनेक गावे पाण्याखाली आले असून, राज्य सरकारचे या गंभीर नैसर्गिक आपत्तीकडे दुर्लक्ष होत आहे. खा. राहुल गांधी यांनी हा मुद्दा संसदेत उपस्थित करण्याचे आश्वासन गावकर्यांना दिले आहे, अशी माहिती काँग्रेस कार्यकर्ते जगदीश मंजू यांनी मीडियाशी बोलताना दिली. शुक्रवारी खा. गांधी यांनी बनासकांठा भागात पूरस्थितीची पाहणी केली. त्यावेळी खा. गांधी यांच्या ताफ्यावर अचानक एका गटाने दगडफेक सुरु केली, तसेच मोदी-मोदीचे नारे दिले. या दगडफेकीने खा. गांधी यांच्या वाहनाच्या काचा फुटल्या, तर राहुल हे थोडक्यात बचावले. त्यांना काहीही दुखापत झाली नसली तरी त्यांच्यावर झालेला हा प्राणघातकच हल्ला होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. धानेरा येथील लाल चौकात घडलेल्या या प्रकारानंतर पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी तातडीने कारवाई केली. भाषण करण्यास जात असतानाही जमावाने त्यांना काळे झेंडे दाखविले. हल्लेखोर हे भाजपचे कार्यकर्ते होते, असे काँग्रेस नेत्यांनी सांगितले.
हल्ल्यांना घाबरत नाही!
दरम्यान, या हल्ल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खा. राहुल गांधी यांनी सांगितले, की अशा प्रकारच्या हल्ल्यांना आपण अजिबात घाबरत नाही. पूरपीडित ग्रामीण जनतेसाठी जे करणे शक्य होईल, ते करू. पीडितांच्या पुनर्वसनासाठी संसदेत आवाज उठवू. याप्रसंगी त्यांच्यासोबत राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि राज्य काँग्रेसचे सचिव सचिन पायलट यांचीही उपस्थिती होती. काँग्रेसचे नेते भरतसिंह सोलंकी हे या हल्ल्यात जखमी झाले आहेत.