राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून लोकसभेत प्रचंड गदारोळ; भाजप खासदार आक्रमक !

0

नवी दिल्ली: कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशाची वाटचाल ही ‘मेक इन इंडियाकडून रेप इन इंडिया’कडे चालली असल्याचे वक्तव्य केले होते. झारखंड येथील प्रचारसभेत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर आरोप करताना देशाची वाटचाल ‘मेक इन इंडियाकडून रेप इन इंडिया’कडे होत असल्याचे भाष्य केले होते. या विधानावरून त्यांच्यावर टीका होत आहे. दरम्यान आज शुक्रवारी १३ रोजी लोकसभेत भाजप खासदारांनी गदारोळ केला. राहुल गांधी यांनी समस्त महिला वर्गांचा अपमान केला असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांनी माफी मागावे अशी मागणी करत सभागृहात गदारोळ केला.

देशातील बलात्काराच्या घटनेवरून आणि घसरत्या आर्थिक विकास दरावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. भारताची वाटचाल आता ‘मेक इन इंडियाकडून रेप इन इंडिया’कडे चालली असल्याचे आरोप राहुल गांधी यांनी केले होते. राहुल गांधी यांचे हे विधान महिलांचे अपमान करणारे असल्याने त्यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपकडून होत आहे.

गांधी कुटुंबातील आणि कॉंग्रेसचे मोठे नेते राहुल गांधी यांनी देशातील नागरिकांना बलात्काराचे आवाहन केले आहे असे आरोप स्मृती इराणी यांनी केले. देशातील नागरिकांना बलात्कार करण्याचे आवाहन करण्याचे पाप राहुल गांधींनी केले असून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी इराणी यांनी केली आहे.