राहुल गांधींच्या पुण्यातील सभेत मोदी-मोदीच्या घोषणा

0

पुणे – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुण्यात हडपसरच्या मगरपट्टा सिटी येथे तरुणांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधींनी एका प्रश्नाचे उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करताच तरुणांनी मोदी मोदी अशी जोरदार घोषणाबाजी केली. माझे नरेंद्र मोदींवर प्रचंड प्रेम आहे, माझा त्यांच्यावर अजिबात राग नाही, पण त्यांचा माझ्यावर राग आहे असे राहुल गांधींनी म्हणताच हॉलमध्ये नरेंद्र मोदींच्या नावे घोषणाबाजी करण्यात आली.

मराठी अभिनेता सुबोध भावे आणि आरजे मलिष्का राहुल गांधींची मुलाखत घेतली. राहुल गांधी यांनी पाच हजार महाविद्यालीयन विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी राजकारणात निवृत्ती असली पाहिजे का? असा प्रश्न विचारला असता आपण त्याच्याशी सहमत असल्याचे सांगितले. वयाच्या 60 व्या वर्षी राजकारणातून निवृत्त झाले पाहिजे असे मत राहुल गांधींनी व्यक्त केले. आम्ही अनेकांशी संवाद साधून त्याचं म्हणणं जाणून घेतले आणि त्यानंतर जाहीरनामा तयार केला.

72 हजारांची कल्पनाही मला लोकांशी बोलल्यानंतर सुचली अशी माहिती राहुल गांधींनी दिली. जे शक्य आहे तेच मी बोलतो. मला उगाच हवेत बोलायला आवडत नाही असेही त्यानी म्हटले. रोजगाराच्या प्रश्नावर बोलतांना भारत रोज 24 हजार नोकर्‍या गमावत आहे, आपल्या देशात कौशल्याचा आदर केला जात नाही अशी खंत राहुल गांधींनी व्यक्त केली. ‘तुम्ही 72 हजार रुपये कसे उभारणार विचारले असता तुम्ही नीरव मोदी, विजय मल्ल्या यांच्याबद्दल ऐकले आहे का अशी राहुल गांधींची विचारणा केली. 72 हजार रुपये देण्यासाठी आयकर वाढवला जाणार नाही याची हमी मी देतो, सर्वसामान्यांना कोणताही फटका बसणार नाही असेही ते म्हणाले. एअर स्ट्राइकसंबंधी बोलताना त्याचं सर्व श्रेय हवाई दलाचे आहे. एअर स्ट्राइकचे राजकारण करण्याच्या विरोधात मी आहे, मला त्याचं राजकारण करायचे नाही. पंतप्रधान जेव्हा अशा गोष्टींचं राजकारण करतात तेव्हा मला वाईट वाटते असे राहुल गांधी म्हणाले.