नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केलेल्या धडाकेबाज भाषणाची सर्वत्र प्रशंसा होत असताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनीही सुषमा यांचे कौतुक केले आहे. सुषमांनी काँग्रेसच्या दुरदृष्टीला मान्यता दिल्याबद्दल राहुल यांनी त्यांचे आभार मानले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत सुषमा स्वराज यांनी दहशतवादाच्या मुद्यावरून पाकिस्तानची कोंडी केली. तसेच पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा पाढा वाचत दहशतवादाला आळा घालण्याचे आवाहन केले.
यावेळी सुषमा स्वराज यांनी भारतातील आयआयटी आणि आयआयएमचा उल्लेख करत भारताने प्रगतीचा तर पाकिस्तानने दहशतवादी तळ उभारण्याचा मार्ग पत्करल्याचा टोला लगावला. सुषमा यांच्या याच वक्तव्याचा संदर्भ घेत राहुल गांधी यांनी मोदी आणि भाजपावर निशाणा साधला. राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणले, सुषमाजी, आयआयटी आणि आयआयएम स्थापन करण्याच्या काँग्रेस सरकारांच्या दुरदृष्टी आणि वारशाला मान्यता देण्यासाठी धन्यवाद! राहुल गांधीच्या या ट्विटचे अनेक नेटिझन्स समर्थन करत आहेत. तर काही जण त्यावर टीकाही करत आहेत.