पुणे-कॉंग्रेसवर असलेल्या बोफोर्स घोटाळ्याचा कलंक पुसण्यासाठी राहुल गांधी यांनी राफेल करारावरुन नरेंद्र मोदींवर आरोप केले. दरम्यान आता सर्वोच्च न्यायालयाने राफेल करारात कोणत्याही प्रकारचे अपहार झालेले नसल्याचे स्पष्ट केले आहे. राहुल गांधी खोट्या माहितीच्या आधारे आरोप करत असून त्यांनी आधी यासाठी माफी मागावी, अशी मागणी भाजपाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्ष खासदार पूनम महाजन यांनी केली आहे.
राहुल गांधींनी माफी न मागितल्यास देशभरात भाजपा कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयांबाहेर आंदोलन करतील, असा इशाराच त्यांनी दिला.
आज पूनम महाजन यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर हल्लाबोल केला. या पत्रकार परिषदेत शहर अध्यक्ष योगेश गोगावले, आमदार योगेश टिळेकर, नगरसेवक मुरलीधर मोहोळ हे उपस्थित होते.
भाजपावर सध्या जे विमान खरेदीवरुन आरोप करत आहे त्यांनी देशाच्या रक्षणासाठी २००७ ते २०१४ दरम्यान विमान खरेदी का केली नाही, असा सवाल उपस्थित करत राहुल गांधी यांनी या संपूर्ण प्रकरणावर माफी मागावी अन्यथा लवकरच देशभरातील काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजपा कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
काँग्रेसच्या राफेलबाबतच्या ज्या काही तक्रारी असतील किंवा आरोप असतील, त्याबद्दल संसदेत चर्चा करावी. मात्र संसदेचे कामकाज विरोधक घोषणाबाजी करुन चालू देत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. संसदेच्या बाहेर आरोप करत राहुल गांधी देशाची प्रतिमा मलिन करत असल्याचे त्यांनी नमूद केले. काँग्रेसकडून सुप्रीम कोर्टाचा वापर आपल्या स्वार्थासाठी केला जातो, असे त्यांनी सांगितले. शीख हत्याकांडात काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांची नावे आहेत. दिल्ली हायकोर्टाच्या आजच्या निर्णयानंतर शीख समाजाला दिलासा मिळाला असेल, असे त्यांनी सांगितले.