राहुल गांधी काँग्रेसचे पुढील अध्यक्ष?

0

ज्येष्ठ काँग्रेस नेते वीरप्पा मोईलींचे सूचक वक्तव्य

नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी हे पुढील महिन्यात काँग्रेस अध्यक्षपदी विराजमान होऊ शकतात, असे स्पष्ट संकेत पक्षाचे ज्येष्ठ नेते एम. वीरप्पा मोइली यांनी दिले. राहुल गांधी यांना पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान व्हायला आवडेल, असेही ते म्हणाले. राहुल यांनी पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळल्यास काँग्रेससाठी हा बदल ’गेम चेंजर’ ठरेल तसेच ते पक्षाच्या आणि देशाच्याही भल्याचे ठरेल, असा विश्वास मोइली यांनी व्यक्त केला.

ते अध्यक्ष व्हावेत ही सर्वांची इच्छा
राहुल यांनी अध्यक्ष व्हावे, असे पक्षातील सर्वांनाच वाटत आहे. खरे तर यासाठी उशीरच झाला आहे. आता राहुल यांना संघटनात्मक निवडणुकीची प्रतीक्षा आहे. रितसर निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातूनच आपण अखिल भारतीय काँग्रेस समितीचा अध्यक्ष म्हणून निवडून यावे, असे त्यांचे स्पष्ट मत असल्याचे मोइली यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्यापेक्षा अधिक लायक उमेदवार काँग्रेसकडे नसल्यामुळे त्यांना अध्यक्ष म्हणून संधी मिळत असेल तर इतरांना पोटात दुखण्याचे कारण नाही.

सध्या राज्यस्तरावर संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या महिन्यात या निवडणुका पूर्ण होणार आहेत. त्यानंतर पुढच्या महिन्यात अखिल भारतीय काँग्रेस समितीची निवडणूक होईल, असे मोइली म्हणाले. राहुल गांधी पुढच्या महिन्यात काँग्रेसचे अध्यक्ष होतील का?, असा थेट प्रश्न विचारला असता, अशी शक्यता आहे, असे सूचक उत्तर मोइली यांनी दिले.

काँग्रेसच्या अपेक्षा उंचावल्या
मोईली म्हणाले राहुल गांधी यांच्याकडे नवा दृष्टीकोण आणि नवी पद्धती आहे. काँग्रेसचा विश्वास वाढवण्यासाठी काय करण्याची गरज आहे, असे विचारले असता मोईली म्हणाले, राहुल गांधी त्यासाठी काम करत आहेत. प्रत्येक राज्याचा वेगळा प्रश्न आहे. प्रत्येक राज्याची वेगळी स्ट्रॅटेजी तयार करावी लागेल, फक्त विधानसभेसाठी नाही तर आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी स्ट्रॅटेजी करावी लागेल.