राहुल गांधी, गुजराती जनतेचे अभिनंदन!

0

गुजरातमध्ये केंद्रात व राज्यात सत्ताधारी असलेला भाजप जिंकला आहे. या पक्षाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या जोडगोळीच्या रणनीतीला काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी तोडीसतोड उत्तर दिले. गुजरातमधील विजय भाजपला पचविणे कठीण आहे; कारण ते जिंकूनही पराभूत झाले आहेत. तर काँग्रेस पराभूत होऊनही जिंकली आहे. हार्दिक पटेल म्हणतो त्या प्रमाणे, भाजपचा विजय ईव्हीएम घोटाळा आहे की नाही, हे निश्चित सांगता येणार नाही. हार्दिकचा आरोप खरा असेल तर ही जीत लबाडीची आहे, असेही म्हणावे लागेल. गुजरातच्या अगदी निसटत्या विजयासाठी मोदी-शहा या जोडगोळीला शुभेच्छा; तर मांजरांच्या गळ्यात घंटा बांधण्याचे काम केल्याबद्दल गुजराती जनतेचेही अभिनंदन!

गुजरात निवडणूक निकालाचे देशाच्या राजकारणावर दीर्घकाळ परिणाम पडणार आहेत. शेवटच्या टप्प्यात व्यापारीवर्गाला चुचकारण्याचे काम भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केले नसते, व त्यासाठी खास व्यापारीवर्गाच्या बैठका लावल्या नसत्या तर आज या राज्यातील निकाल वेगळा असता. ‘आपली माणसं’ म्हणून तेथील 99 मतदारसंघातील जनतेने मोदी-शहा या जोडगोळीला विजयाइतकी मते दिली असली तरी, या मतांतून भाजप विजयी झाला असे अजिबात म्हणता येणार नाही. तेथील सुज्ञ जनतेने मांजराच्या गळ्यात घंटा बांधली आहे, हे आपसूक अधोरेखित झाले आहे. देशातील जनतेला गुजरात मॉडेल म्हणून सांगितल्या जात होते. परंतु, या मॉडेलवर खुद्द गुजराती जनतेचाच विश्वास राहिलेला नाही, हे या निवडणुकीने स्पष्ट झाले. निवडणूक जशी मोदी-शहांसाठी प्रतिष्ठेची होती. तद्वतच ती काँग्रेसचे नूतन अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठीही महत्वपूर्ण होती. गुजराती जनतेने राहुल यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. गेल्या अनेक दशकानंतर गुजरातमध्ये काँग्रेसला जे घवघवीत यश मिळाले ते केवळ अन् केवळ राहुल गांधी यांचाच करिष्मा म्हणावा लागेल. विजयाचा वारू चौफेर उधळलेल्या मोदी-शहा जोडगोळीला त्यांच्यात गृहराज्यात जबरदस्त आव्हान उभे करणे हे काही सोपे काम नव्हते. चाणाक्ष नेतृत्व म्हणून राहुल यांनी हे आव्हान उभे केले. अगदी शेवटी शेवटी मोदींनी गुजराती अस्मितेला हात घातला नसता, स्वतःच्या जातीवर घसरले नसते अन् व्यापारीवर्गाला विनवण्या केल्या नसत्या तर आज गुजरात मोदींच्या हातातून गेले असते, हे अगदी सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.

गुजरातमध्ये काँग्रेसचे मोठे पानिपत होईल, असा आत्मविश्वास असलेले अमित शहा यांनी या राज्यात भाजपला दिडशे जागा मिळतील, असा दावा केला होता. हा दावा ते सत्यात उतरवू शकले नाहीत. अगदी काट्याच्या लढती तर झाल्याच; परंतु गुजराती जनतेने भाजपला शंभरीही गाठू दिली नाही. 99 चा आकडा गाठतानाही त्यांची दमछाक झाली. गृहराज्यात विजयी झाले असले तरी या विजयाचा आनंद साजरा करावा, अशी परिस्थिती नाही. किंवा या विजयाच्या वल्गना कराव्यात, अशीही वस्तुस्थिती नाही. त्यामुळे गुजरातमध्ये शहा-मोदी जिंकूनही पराभूत झाले आहेत. तर राहुल गांधी हे पराभूत होऊनही जिंकले आहेत. या निवडणुकीने भाजपला सूचक इशारा देण्यात आला आहे. देशातील जनमत झपाट्याने बदलत असून, ते आता भाजपला पुरक राहिलेले नाही. त्याचा परिणाम भाजपला लोकसभा निवडणुकीत भोगावा लागेल. देशातील वारे बदलले असून, भाजपसाठी ते उलटे फिरण्यास सुरुवात झाली आहे. मोदींच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे यातच भाजपचा मोठा पराभव आहे. त्यामुळे मोदी नावाचे वादळ आता ओसरतीला लागले अन् राहुल नावाचे वादळ निर्माण होत आहे, ही बदललेली परिस्थिती बरेच काही सांगून जाते. गुजरात निवडणुकीने राहुल यांना बरेच काही शिकविले. त्यांच्यातील बदल देशवासीयांच्या नजरेत आलेत. परिपक्व, चाणाक्ष आणि संवेदनशील नेतृत्व म्हणून ते दृष्टीपथास आलेत.

मोदी भ्रष्टाचाराबद्दल काहीच बोलले नाहीत. तसे बोलायला गेले असते तर त्यांना राफेल आणि जय शहा यांच्यावरही बोलावे लागले असते. म्हणून, स्वच्छ चारित्र्याचा नेता ही स्वतःची प्रतिमा कायम राखण्यातही मोदी अपयशी ठरले आहेत. मोदीही धुतल्या तांदळाचे नाहीत, हा संदेश देशात गेला. म्हणून, काँग्रेसचा पराभव होऊ शकला नाही, अन् त्यांच्या काँग्रेसमुक्त भारताच्या मोहिमेला मोठी खीळच बसली. ‘मेरा भाषण ही शासन’ हीच आता काय ती मोदींची प्रतिमा उरली आहे. गुजरातसह हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला बहुमत मिळाले असले तरी, हिमाचलमध्ये भाजप सत्तेवर येणे निश्चितच होते. तेथे अ‍ॅण्टी इनकम्बसी फॅक्टर निर्माण झाले होते. या छोट्याशा राज्यात काँग्रेस व भाजप वारंवार सरकार बनवित आले आहेत. यावेळीही तेच झाले. वीरभद्र सिंह यांच्या नेतृत्वातील सरकार तेथे सत्तेवर येणार नाही हे काँग्रेससह सर्वांनाच ठावूक होते. परंतु, भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार प्रेमकुमार धूमल यांचा पराभव होत असेल तर भाजपची ती मोठीच नाचक्की ठरली आहे. हिमाचलमध्ये काँग्रेसने ताकद लावलीच नव्हती. या उलट गुजरातमध्ये अवघ्या साडेतीन महिन्याच्या काळात काँग्रेसने जनमत आपल्याला अनुकूल असे बनविले होते. मोदी जिंकले असले तरी राहुल पराभूत झाले नाहीत, हाच मोठा काँग्रेसचा या राज्यातील विजय म्हणावा लागेल. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधी हे भाजपसाठी शुभ आहेत. शुभ किंवा अशुभाची भाषा भाग्यवादी व पलायनवादी मानसिकतेची माणसे करत असतात. तरीही राहुल हे भाजपसाठी शुभ असले तरी ते काँग्रेससाठीही शुभच आहेत. त्यांच्याच नेतृत्वात काँग्रेसला ऊर्जितावस्था प्राप्त होणार आहे. काही वर्षांपूर्वीच राहुल यांना हेच भाजपचे नेते मोदींच्या तुलनेत कमी लेखत होते. आज परिस्थिती अशी बदलली आहे की, हेच राहुल गांधी मोदींना तोडीस तोड ठरत आहेत. गुजरातमध्ये अख्खे केंद्र सरकार उतरले होते. भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही तळ ठोकून होते. पाण्यासारखा पैसा वाहिला, प्रसारमाध्यमे हाताशी धरण्यात आली. खुद्द मोदी-शहा यांना गुजरातमध्ये तळ ठोकावा लागला, पंतप्रधानांचे परदेश दौरे रद्द झालेत. इतकी ताकद भाजपला एका राज्यात खर्ची करावी लागली, याचा अर्थ काय होतो? राहुल हे आता मोदींसाठी मोठे आव्हान म्हणून उभे ठाकले आहेत. अन् त्यांच्या नेतृत्वात 2019ची लोकसभा निवडणूक मोदींसाठी अजिबात सोपी राहिलेली नाही.