राहुल गांधी पंतप्रधान बनण्याचा प्रश्नच येत नाही-आठवले

0

मुंबई-एकेकाळी काँग्रेसचे सहकारी राहिलेले विद्यमान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. देशात अजूनही मोदी लाट सुरू असून पुढील १० ते १५ वर्षे ती कायम राहील. त्यामुळे राहुल गांधी पंतप्रधान बनण्याचा प्रश्नच नाही, असे मत व्यक्त केले आहे.

जर २०१९ मध्ये काँग्रेसला पुरेशा जागा मिळाल्या तर मी पंतप्रधान होऊ शकतो, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा आठवले यांनी समाचार घेत असे होणे शक्यच नाही असे सांगितले आहे. कारण किमान १० ते १५ वर्षे मोदी लाट चालेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी सर्वच निवडणुकांत मोदी लाट चालेल. कारण ते समाजातील सर्व वर्गांना बरोबर घेऊन जाण्यात विश्वास ठेवतात.

क्रिमीलेअर अंतर्गत येणाऱ्या जातींना आरक्षणामध्ये सहभागी करण्यासाठी आरक्षणाची टक्केवारी ४९.५ टक्क्यांवरून ७५ करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. मायावतींना दलितांसाठी जर काही करायचे असेल तर त्यांनी भाजपाला पाठिंबा द्यावा असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.