राहुल गांधी पुन्हा सक्रीय; केरळ दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद

0

वायनाड: लोकसभा निवडणुकीत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे प्रचंड नाराज झाले होते. त्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा देखील कार्यकारिणीकडे सोपविला होता. पराभवानंतर ते निरुत्साही दिसून येत होते, मात्र पुन्हा एकदा ते सक्रीय झाले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे आजपासून केरळमधल्या त्यांच्या वायनाड या मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या तीन दिवसीय दौऱ्याला आजपासून सुरूवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. या दौऱ्यादरम्यान रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. याच रोड शो दरम्यान त्यांनी एका चहाच्या दुकानात जाऊन कार्यकर्त्यांसोबत चहा आणि नाश्त्याचा आस्वाद घेतला. काँग्रेस अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी आपल्या दुकानात आल्याने दुकानदारही हरखून गेला. राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे नेते मुकुल वासनिकही होते. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दीही केली होती. राहुल गांधी हे वायनाड लोकसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने निवडून आले आहेत.