राहुल गांधी, प्रियंका गांधी लाइव्ह पेट्रोल बॉम्ब: भाजपा नेत्याचे वादग्रस्त विधान

0

हरियाना: राहुल गांधी, प्रियंका गांधी ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग भडकून सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होते. त्या मुळे हे दोघे लाइव्ह पेट्रोल बॉम्ब असल्याचे वादग्रस्त विधान हरियानाचे गृहमंत्री अनिल वीज यांनी केले आहे. वीज यांनी आपल्या ट्वीटरवर वादग्रस्त विधान केले आहे. तसेच प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांच्यापासून सावधान राहाण्याचा सल्ला दिला आहे.

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या दोघांना मंगळवारी मेरठमध्ये अडवण्यात आलं होतं. हे दोघेही मेरठमध्ये आंदोलन झाले त्यामध्ये बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयाच्या भेटीसाठी हे दोघे जात होते. त्यानंतर वीज यांचे वक्तव्य समोर आलं आहे.एनआरसी आणि सीएए या कायद्याविरोधात देशभरात जनक्षोभ उसळला आहे. या दोन्ही कायद्यांना सात राज्यांमध्ये विरोध होतो आहे. आसाम तर याविरोधात पेटलं. उत्तर प्रदेशातही या विरोधात पडसाद उमटले. दरम्यान मेरठमध्ये हे आंदोलन सुरु असताना ज्यांचे बळी गेले त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधी आले होते.

यापूर्वीही वीज यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर टीका केली होती. त्यांनी इटलीहून येऊन भारताचं नागरिकत्व घेतलं. परंतु शेजारी देशांमध्ये हाल सोसत असलेल्या हिंदूंच्या नागरिकत्वाला त्या विरोध करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. कॉंग्रेसचे नेते वीज यांच्या विधानावर काय उत्तर देतात ते पाहणे औस्तुक्याचे ठरेल.