राहुल गांधी यांच्यावरील खटल्याची सुनावणी १० सप्टेंबरला

0

ठाणे :राष्ट्रीय स्वयं सेवक संघाच्या मानहानी प्रकरणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी शुक्रवारी भिवंडी न्यायालयात झाली. गांधी यांच्यावतीने वकील सुदीप पाटभोर आणि नारायण अय्यर यांनी न्यायालयात बाजू मांडली.

याचिकाकर्त्यांनी राहुल गांधी यांच्याविरुद्ध यापूर्वीच न्यायालयात दोषारोप सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे सादर केली आहेत. यावर आज सुनावणी वेळी दोन्ही बाजूच्या वकिलांमध्ये प्रिन्सिपल सिव्हिल न्यायाधीश ए. ए. शेख यांच्या न्यायालयात युक्तिवाद झाला. यावेळी राहुल गांधी यांच्या वकिलांनी दोषारोप पत्रासोबत सादर केलेले पुरावे सिद्ध करावे हा युक्तीवाद मान्य करत न्यायालयाने पुढील सुनावणी १० सप्टेंबर रोजी ठेवली आहे.

महात्मा गांधीजींची हत्या आरएसएसनेच घडवून आणली असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी ६ मार्च २०१४ रोजी पंधराव्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भिवंडीतील सोनाळे ग्राऊंडवर केले होते. या वक्तव्याने मानहानी झालेल्या आरएसएसच्या शहर जिल्हा कार्यवाहक राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. न्यायालयाकडून आरोप निश्चितीसाठी राहुल गांधी यापूर्वी ९ मे २०१५, ३० जानेवारी २०१७ आणि १२ जून २०१८ अशी तीन वेळा हजेरी लावली आहे.

१२ जून रोजीच्या सुनावणी वेळी गांधी यांचे वकील नारायण अय्यर, तुषार मोर, सुदीप पाटभोर यांनी समन्स ट्रायलप्रमाणे ही केस चालवण्यासाठी दाखल केलेला अर्ज भिवंडी न्यायालयाने मंजूर केला होता.

दरम्यान, राहुल गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन सदर दाव्याची सुनावणी दिल्ली न्यायालयात करण्याची विनंती केली होती. गांधी यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून भाषणातील वक्तव्याची कबुली दिलेली आहे. मात्र १२ जून रोजी भिवंडी न्यायालयासमोर उभे राहून गांधी यांनी आरोप फेटाळल्याने ते कायदेशीररित्या अडचणीत सापडल्याचे मत याचिकाकर्ते कुंटे यांनी व्यक्त केले होते.

मात्र आमच्याकडून त्यावेळी रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ती त्यापुरतीच मर्यादित होती. आता मात्र दाव्याची सुनावणी सुरु झाली असून या दाव्याची पुढील सुनावणी १० सप्टेंबर रोजी असल्याची माहिती राहुल गांधी यांचे वकील नारायण अय्यर यांनी दिली.