राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावरून संभ्रम

0

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्या पराभवावर मंथन करण्यासाठी शनिवारी कॉंग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत कॉंग्रेसचे अनेक दिग्गज नेते हजर होते. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती, पण राहुल गांधी यांनी अद्याप औपचारिकरीत्या राजीनामा सादर केलेला नाही, असे कॉंग्रेस प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे.

कॉंग्रेस पक्षाला या लोकसभेच्या निवडणुकीत ५४२ पैकी फक्त ५२ जागांवर विजय प्राप्त करता आला आहे. स्वत: राहुल गांधी हे आपल्या पारंपरिक मतदार संघ असलेल्या अमेठी मतदार संघातून स्मृती इराणी यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. १९ राज्यामध्ये कॉंग्रेस पक्षाला आपले खाते सुद्धा उघडता आले नाही. या पार्श्वभूमीवर राहुल यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. या बैठकीत राहुल यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव मांडला होता, पण कार्यकारिणीने त्यांचा राजीनामा स्वीकारला नसल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले.

या बैठकीअगोदर राहुल गांधी हे राजीनामा देणार अशी चर्चा  कार्यकारिणी समितीमधील सदस्यांना लागली होती.  बैठक सुरु होताच कार्यकारिणीमधील सदस्यांनी राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ नये असे सांगितले.  राहुल गांधी यांनी प्रस्ताव सादर करण्यापूर्वीच कार्यकारिणीने त्यांच्या राजीनाम्याला विरोध दर्शवला. सध्या कार्यकारिणीमधील सदस्य बोलत असून सर्वांनी बाजू मांडल्यानंतर राहुल गांधी बोलतील, असे सूत्रांनी सांगितले.