मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता भरचौकात राहुल गांधी यांना फोडावे असे आवाहन वीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी केले आहे. जर कोणी वीर सावरकरांचा अपमान करेल तर त्याला भर चौकात फोडून काढू, असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे अनेकदा म्हणाले आहेत. राहुल गांधी यांच्या वीर सावरकर यांच्यावर वादग्रस्त विधानकेले होते. त्यावर आक्षेप घेत रणजीत सावरकर यांनी प्रत्युत्तर दिलं.
‘राहुल गांधींचं नाव राहुल सावरकर नाही, ही चांगली गोष्ट आहे, अन्यथा आम्हा सर्व सावरकरांना तोंड काळं करून फिरावं लागलं असतं. आज राहुल यांनी सातत्याने सावरकरांवर ब्रिटीशांची माफी मागितल्याचे आरोप केले. पण सावरकरांनी कधीही ब्रिटिशांची माफी मागितली नव्हती. त्यांनी अटी मान्य करून सुटका करून घेतली होती, हे जगजाहीर आहे. सावरकरांनी अटी मान्य केल्या पण कधीही ब्रिटीश राजनिष्ठेची शपथ घेतली नाही, जी पंडित नेहरुंनी घेतली होती,’ अशा शब्दात वीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
‘सावरकरांसारख्या देशभक्ताच्या अंत्ययात्रेला तोफगाडा मागितला, तेव्हा या लोकांनी नकार दिला. पण नेहरुंची मैत्रीण असलेल्या माउंटबॅटन यांच्या अंत्यविधीसाठी न मागताच भारताची आयएनएस त्रिशूळ ही युद्धनौका तेथे पाठवली होती. देश ही स्वत:ची जहागीर असल्याप्रमाणे काँग्रेस वागते, हे अत्यंत निषेधार्ह आहे. लोकांनी आधीच काँग्रेस पक्षाला त्याची जागा दाखवून दिली आहे. भविष्यातही लोकांनी याचं उत्तर द्यावं,’ असं आवाहनही रणजीत सावरकर यांनी केलं.