नवी दिल्ली-सत्तेत परतण्याच्या काँग्रेसच्या दाव्याची केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी खिल्ली उडवली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीतील आपली जागाही वाचवू शकणार नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे. परंतु, पेट्रोलियम पदार्थाच्या वाढत्या किंमती आणि काळ्या पैशाच्या प्रश्नावर उत्तर देणे त्यांनी टाळले.
विधानसभा मतदारसंघात पराभूत
अमेठीतील विधानसभा मतदारसंघात ते पराभूत झाले. मागील चार वर्षांत प्रत्येक स्थानिक निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आपल्याच मतदारसंघात पराभूत होणे त्यांचे निश्चित आहे. त्यामुळे पुन्हा सत्तेत येण्याची त्यांची कोणतीच शक्यता नाही. राहुल गांधी आपल्या मतदारसंघात जिल्हाधिकाऱ्यांचे एक कार्यालयही सुरू करू शकलेले नाहीत आणि दुसरीकडे ते विकासाबाबत भाषणे देत आहेत, असे वक्तव्य केले.
४८ महिन्यांचे सुशासन
एका कुटुंबाच्या ४८ वर्षांची उदासिनता विरूद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ४८ महिन्यांचे सुशासन असल्याचा दावा त्यांनी केला. रालोआला सत्तेवर आल्यानंतर घोटाळ्यांशी झगडावे लागले. मागील काँग्रेस सरकारने वाढवून ठेवलेल्या कर्जाचा सामना करावा लागला. आता कोणत्याही परिस्थिती लोकांच्या सामाजिक गरजा पूर्ण करण्याचे आम्ही निश्चित केले आहे.
तेलाच्या वाढत्या किंमती आणि काळ्या पैशाबाबतचे प्रश्न टाळत त्यांनी सरकार लवकरच यावर तोडगा काढतील अशी ग्वाहीही दिली. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या दीक्षांत समारंभात सहभागी होण्यासाठी त्या आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी विविध विषयांवर चर्चा केली.