राहुल गांधी व्यसनी; पंतप्रधानपदासाठी ते लायक नाही

0

नवी दिल्ली-शिरोमणी अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंग सिरसा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केले आहे. राहुल गांधी हे व्यसनी असून पंतप्रधानपदावर विराजमान होण्याची त्यांची लायकी नाही, असे ट्विट मनजिंदर सिंग यांनी केले आहे. भाजपाच्या पाठिंब्यावर दिल्लीतील राजौरी गार्डन पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून मनजिंदर सिंग सिरसा हे आमदार म्हणून निवडून आले आहेत.

मनजिंदर सिंग सिरसा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत राहुल गांधी विमानतळावर रांगेत उभे असल्याचे दिसते. या ट्विटमध्ये सिरसा म्हणतात, जो पंजाबमधील ७० टक्के तरुणांना अमली पदार्थांचे व्यसन आहे असे म्हणत होता, तोच आज व्यसनी दिसत आहे असे त्यांनी म्हटले आहे.

मध्य प्रदेशमध्ये सत्तेवर आल्यास कर्जमाफी देऊ, असे आश्वासन देणाऱ्या राहुल गांधींवर टीका करताना सिरसा म्हणतात, राहुल गांधी यांनी असेच आश्वासन पंजाबमध्येही दिले होते. पण निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी आता नरेंद्र मोदी सरकारने कर्ज माफ करावे, अशी मागणी केली. आता मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांचीही राहुल गांधींकडून फसवणूक केली जात आहे. अशी खोटारडी व्यक्ती पंतप्रधानपदाची दावेदार असली पाहिजे का, असा सवाल त्यांनी विचारला आहे.