गुजरात निकालानंतर पहिलीच भेट
अहमदाबाद : विधानसभा निवडणुकीत यश मिळविल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी शनिवारी प्रथमच गुजरातमध्ये आले. अहमदाबादमध्ये आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम सोमनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. पूजेचे ताट घेऊनच ते मंदिरात गेले. तिथे त्यांनी विधिवत पूजा केली. यापूर्वी ते निवडणूक प्रचारादरम्यान गुजरातेतील 27 मंदिरांमध्ये गेले होते. सोमनाथमध्ये त्यांचे गैरहिंदू रजिस्टरवर नाव दाखल झाल्याने वाद उभा राहिला होता. राहुल यांच्या मंदिर भेटींमुळे भाजपची मोठी अडचण झाली आहे.
मंदिर डिप्लोमसी सुरूच
शनिवारी सकाळीच राहुल गांधी गुजरातमधील अहमदाबादेत पोहोचले. त्यांनी गुजरातमध्ये मिळालेल्या यशामुळे खुशीत होते. तिथे पोहोचल्यानंतर स्थानिक नेते व कार्यकर्त्यांसह पूजेचे ताट घेऊन त्यांनी सोमनाथ मंदिराला भेट देऊन पूजाअर्चा केली. या पार्श्वभूमीवर राहुल यांच्या मंदिर डिप्लोमसीची चर्चा पुन्हा एकदा गुजरातमध्ये सुरू झाली आहे.
काँग्रेसलाही देवदर्शनाचा लाभ?
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी गुजरातमधील 25 हून अधिक मंदिरांना भेटी दिल्या होत्या. त्यांच्या या देवदर्शनाचा गुजरातमध्ये काँग्रेसला बराच फायदा झाला. काँग्रेसच्या बाजूने वातावरणनिर्मिती होऊन भाजपच्या हिंदुत्ववादी प्रचाराची धार बोथट झाल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसला ही निवडणूक जिंकता आली नसली तरी मागील निवडणुकीच्या तुलनेत जागा खूपच वाढल्या आहेत. गुजरातची सत्ता मिळविताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपची चांगलीच दमछाक झाली होती. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली गेल्याने राहुल यांचीही राजकीय प्रतिमा अधिक सुधारली आहे. मात्र, मंदिर डिप्लोमसी काँग्रेसला किती फायद्याची ठरणार हे 2019च्या निवडणुकीतच समजणार आहे. या डिप्लोमसीमुळे केवळ राहुल गांधी नव्हे तर काँग्रेसच्या विचारांचीही दिशाही बलणार आहे.