राहुल जाधव यांची नाराजी दूर करण्यास नेत्यांना अपयश

0

स्थायी समिती सदस्यपदाचा अखेर राजीनामा मंजूर
विषय समित्यांच्या सभापतिपदी तरी वर्णी लागणार का?

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पक्षातील नाराजीनाट्य अद्यापही संपुष्टात आले नसल्याचे दिसून आले असून, नाराज असलेल्या नगरसेवक राहुल जाधव यांचा स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा मंजूर करण्याची वेळ अखेर स्थानिक भाजपनेत्यांवर आली आहे. जाधव यांनी दिलेला राजीनामा सोमवारी मंजूर करण्यात आल्याची माहिती महापौर नितीन काळजे यांच्या कार्यालयातून प्राप्त झाली आहे. दरम्यान, जाधव यांना आगामी विषय समित्यांच्या सभापती निवडीत चांगल्या समितीचे सभापती करण्याच्या हालचाली पक्षात घाटत असल्याची माहितीही हाती आली आहे. त्यासाठी स्थानिक नेतृत्वाने त्यांना तयार केले असल्याचेही सांगण्यात आले होते.

राहुल जाधव यांची नाराजी अद्यापही कायम?
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीची चावी असलेल्या स्थायी समितीच्या सभापतिपदी वर्णी लागावी यासाठी नगरसेवक राहुल जाधव यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. ते भाजपचे भोसरीतील सहयोगी आमदार महेश लांडगे यांच्या निकटवर्तीय आहेत. आ. लांडगे यांनी खुद्द जाधव यांच्यासाठी आपले वजन खर्ची घातले होते. परंतु, त्यात त्यांना यश आले नव्हते. अखेर भाजपश्रेष्ठींनी राहुल जाधव यांना डावलून आ. लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक ममता गायकवाड यांची सभापतिपदावर वर्णी लावली होती. या घडामोडींमुळे वर्षभरातच भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली होती. त्यानंतर महापौर नितीन काळजे यांच्यासह राहुल जाधव, क्रीडा सभापती लक्ष्मण सस्ते यांनीही राजीनामे दिले होते. या तिघांचेही मन वळविण्यात भाजप नेत्यांना यश आले होते. परंतु, राहुल जाधव हे आपल्या राजीनाम्यावर ठाम राहिले. त्यामुळे अखेर सोमवारी महापौर नितीन काळजे यांना त्यांचा राजीनामा स्वीकार करावा लागला. आता जाधव यांची विषय समित्यांच्या सभापतिपदी तरी वर्णी लागावी, यासाठी स्थानिक नेतृत्व प्रयत्न करत असल्याची बाबही पक्षसूत्राने सांगितली आहे.

आता रिक्त जागेवर कुणाची वर्णी?
राहुल जाधव यांच्या राजीनाम्याची बाब सत्ताधारी भाजपने गोपनीय ठेवली होती. त्याबाबत अधिकृतरित्या कुणीही पदाधिकारी बोलत नव्हता. परंतु, सोमवारी अचानकपणे जाधव यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. स्थायी समिती सदस्यपदासाठी नगरसेवकांत जोरदार रस्सीखेच होत असताना राहुल जाधव यांनी हे सदस्यपद सोडल्याने याबाबत विविध राजकीय चर्चाही सुरु होत्या. आता त्यांच्या जागेवर कुणाची वर्णी लागते? तसेच राहुल जाधव यांना विषय समित्यांचे सभापतिपद मिळणार का? असे प्रश्नही शहरात चर्चेत होते. सभापतिपद देऊन स्थानिक पक्ष नेतृत्व राहुल जाधव यांची नाराजी दूर करतील, असेही भाजपसूत्राने सांगितले आहे.