राहुल-प्रियांका गांधी पिडीत कुटुंबियांच्या भेटीला; पोलिसांकडून राहुल गांधींना धक्काबुक्की

0

हाथरस: उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. उत्तर प्रदेश सरकारवर टीका होत आहे. दरम्यान आज गुरुवारी १ ऑक्टोबर रोजी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह उत्तर प्रदेश सरचिटणीस प्रियंका गांधी पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी हाथरसला रवाना झाले आहेत. मात्र त्याआधीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. पोलिसांनी यमुना एक्स्प्रेस-वेवर राहुल आणि प्रियंका गांधी यांना रोखले. पोलिसांनी रोखल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसोबत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान यावेळी पोलिसांकडून राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. राहुल गांधी, प्रियांका गांधी आपल्या कार्यकर्त्यांसह पायी चालत होते, यावेळी मोठी गर्दी झाल्याने पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी धक्काबुकी झाली.

काँग्रेस कार्यकर्त्यांकडून यावेळी घोषणाबाजी केली जात आहे. सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत.

प्रियंका गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना योगी सरकारने महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली पाहिजे असे म्हटले आहे. बलात्कार प्रकरणी एसआयटीने तपास सुरु केला आहे. एसआयटी टीम आज पीडित कुटुंबाची भेट घेणार आहे. परिस्थिती पाहता प्रसारमाध्यमांना परवानगी दिली जाणार नाहीये. दरम्यान १४४ कलम लागू असल्याने जिल्ह्यात पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे.