राहुल फाळकेंच्या आत्महत्येने शिवसेनेच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह!

0

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांचा विधानसभेत आरोप

मुंबई:- कराड येथील शिवसैनिक व तरूण सराफा व्यापारी राहुल राजाराम फाळके यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेचे पडसाद सोमवारी विधानसभेत उमटले. फाळके यांच्या फेसबुकवरील सुसाईड पोस्टचे वाचन यावेळी विखे पाटील यांनी करत शिवसेनेवर हल्लाबोल केला. विखे पाटलांच्या या स्थगन प्रस्तावानंतर सभागृहात उपस्थित शिवसेनेचे आमदार आक्रमक झाले. यावेळी सेनेचे गटनेते सुनील प्रभू यांनी याबाबत शिवसेनेकडून फाळके यांच्या परिवाराला मदत केली असल्याचे सांगत विरोधकांचे मगरमच्छ के आसू असल्याचे सांगितले.

अविश्वासाला पाठिंबा देऊन श्रद्धांजली द्या!
विधानसभेत राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावर बोलताना म्हटले की, केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी केलेली नोटाबंदी आणि १ जुलै २०१७ रोजी लागू केलेला जीएसटी, या दोन निर्णयांमुळे व्यापारी उद्धवस्त झाला आहे. राहूल फाळकेची आत्महत्या म्हणजे सरकारने घेतलेल्या या एककल्ली, नियोजनशून्य व कोणतीही पूर्वतयारी न करता घेतलेल्या निर्णयाचा परिणाम आहे.शिवसेनेचा प्रामाणिक कार्यकर्ता आणि उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास असलेल्या या तरूण व्यापाऱ्याची ही शोकांतिका आहे. राहुल फाळकेच्या आत्महत्येने शिवसेनेच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परंतु, त्या व्यापाऱ्याने केंद्र सरकारच्या निर्णयांना कंटाळून आत्महत्या केली आहे आणि त्याच केंद्र सरकारमध्ये शिवसेना सहभागी आहे. त्यामुळे राहुल फाळके आत्महत्येच्या पापात ते देखील तेवढेच दोषी आहेत. आता शिवसेनेकडे आपल्या पापाचं प्रायश्चित करण्याची संधी आहे. केंद्रात अविश्वास ठराव आला आहे. शिवसेना त्या ठरावाच्या बाजूने मतदान करून प्रायश्चित करणार का आणि राहुल फाळकेला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करणार का? असा सवाल विखे पाटलांनी केला.

फाळकेंच्या कुटुंबियांना सेनेकडून मदत
यावर आक्रमक झालेल्या सुनील प्रभू यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव पटलावरून काढण्याची मागणी करत हे विरोधकांचे मगरमच्छ के आसू असल्याचा आरोप केला. फाळके यांनी आत्महत्या केल्यानंतर आपण त्यांना भेटायला गेले का? असा सवाल करत सेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांनी फाळके यांच्या कुटुंबियांना भेट देऊन 20 लाखाची मदत सेनेकडून केली आहे तसेच त्याच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली असल्याचे प्रभू यांनी सांगितले. सेनेची भूमिका स्पष्ट आहे. राजकारण करण्यासाठी तेलगू देसम ने अविश्वास प्रस्ताव आणला, देशहितासाठी प्रस्ताव आणला तर नक्की प्रस्तवाला पाठिंबा देऊ, असे प्रभू यांनी सांगितले.