पुणे । शब्दप्रधान कविता व गीत यांचाच प्रभाव लहानपणापासून माझ्यावर असल्यामुळे मला शब्द आधी व त्यावरच चाल देणे अधिक योग्य वाटते. नाटकांच्या संगीत दिग्दर्शनामध्ये प्रयोगशीलता, सर्जनशीलता जपता आली याचे मला समाधान आहे. मला आव्हानात्मक काम करण्यात मजा येते. त्यामुळेच माझी गाणी गणपती, दहीहंडी अशा उत्सवात नाही वाजली तरी चालतील, पण काहीतरी वेगळे करणारा संगीतकार म्हणून ओळखले गेलेले आवडेल, अशी भावना संगीतकार राहुल रानडे यांनी व्यक्त केली.
गानवर्धन व ललित कला केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ‘मुक्त संगीत’ सत्राचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. अरुण नूलकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी, कार्याध्यक्ष प्रसाद भडसावळे, उपाध्यक्ष दयानंद घोटकर उपस्थित होते.
…यातून घडला संगीतकार
लहान वयात आईने संगीतात करीयर करण्यासाठी दिलेले प्रोत्साहन तसेच शास्त्रीय गाण्याबरोबरच तबला, हार्मोनियम या वाद्यांचे शिक्षण भविष्यात उपयोगी पडत आहे. घरी येणार्या नियतकालिकांमधील कवितांना चाल देण्यापासून हा प्रवास सुरू झाला. पुढे आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा, नाटकातील गायक अभिनेता तसेच नाट्य व संगीत क्षेत्रात पडेल ते काम करण्याची मिळालेली संधी यातून माझ्यातील संगीतकार घडत गेल्याचे रानडे यांनी नमूद केले.
मांजरेकरांच्या सहवासाने समृद्ध
आनंद मोडक, भास्कर चंदावरकर, श्रीनिवास खळे अशा संगीतकारांचा तसेच महेश मांजरेकर यांच्या सारख्या दिग्दर्शकाचा सहवास समृद्ध करणारा ठरला, असे रानडे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कच्चा लिंबू या अगामी चित्रपटातील गीत प्रथमच रसिकांसमोर सादर केले. संगीत देताना आपला विचार कसा असतो हे त्यांनी उलगडून दाखविले.
संयोजकांनाही श्रेय मिळाले पाहिजे
आपल्या कारकिर्दित संगीत संयोजकांचे असलेले महत्वाचे स्थान नमूद करतानाच संगीतकाराबरोबरीनेच संगीत संयोजकांनाही त्यांच्या कामाचे श्रेय मिळाले पाहिजे, असे आग्रहाने रानडे यांनी सांगितले. गानवर्धनच्या शास्त्रीय गायन स्पर्धेतील विजेत्या राधिका ताम्हनकर व कलकत्त्याच्या देवदीप मिश्रा यांना रानडे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासंती ब्रह्मे यांनी केले.