राहुल शिवतारेच्याही मुसक्या आवळल्या!

0

देवेंद्र शहा हत्याकांड

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक देवेंद्रभाई शहा यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी फरार असलेला प्रमुख आरोपी राहुल शिवतारे याला पुण्यातीलच राजाराम पुलाजवळ बेड्या ठोकल्या. मंगळवारी रात्री तो या पुलाजवळ पोलिसांना आढळून आला. या दोन प्रमुख आरोपींसह या दोघांचीही पिस्तुल ठेवून घेणार्‍या सुरेंद्र पाल यालादेखील पोलिसांनी ठाणे येथून जेरबंद केले. त्याच्याकडून दोन पिस्तुल हस्तगत करण्यात आली आहेत. प्रमुख आरोपी जेरबंद झाल्याने शहा यांचा खून नेमका कोणत्या कारणावरून केला, याचा उलगडा पोलिसांना करता येणार आहे.

हत्येत वापरलेले पिस्तुल हस्तगत
शहा हत्याकांडातील मारेकरी रवींद्र चोरगे याला डेक्कन जीमखाना पोलिसांनी जळगाव येथून अटक केली होती. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी राहुल शिवतारे याचा शोध सुरु ठेवला होता. मंगळवारी रात्री शिवतारे राजाराम पुलाजवळ असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला लागली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिवतारेच्या मुसक्या आवळल्या. तसेच, या हल्ल्यात वापरण्यात आलेले पिस्तुल मारेकर्‍यांनी ठाण्यातील सुरेंद्र पाल याच्याकडे ठेवले होते. पोलिसांनी पाल याच्याही मुसक्या आवळून त्याच्या ताब्यातील पिस्तुल हस्तगत केले आहे. शहा यांचा खून नेमका कोणत्या कारणावरून झाला याचा अद्याप उलगडा झालेला नाही. चोरगे हा इस्टेट एजंट होता. तो शेतकर्‍यांकडून जमिनी घेऊन त्या रिअल इस्टेट व्यावसायिकांना कमिशन घेऊन विकत होता. त्यातूनच ही हत्या झाली असावी, असे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.