नवी दिल्ली । दलितांवर होणार्या अन्याय अत्याचारांविरोधात काँग्रेसने देशभरात सोमवारी उपोषण आणि आंदोलन पुकारले होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी स्वतः दिल्लीतील महात्मा गांधी यांच्या स्मृतीस्थळी अर्थात राजघाटावर उपोषणासाठी पोहोचले. मात्र, उपोषणाची वेळ उलटून गेल्यानंतर तब्बल तीन तासांनंतर त्यांनी उपोषणस्थळी हजेरी लावल्याने त्यांना टीकेला सामोरे जावे लागले. दरम्यान, भाजपाकडून राहुल गांधीच्या या उशीरा येण्यावर उपहासात्मक टीका करण्यात आली आहे. दलितांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि मोदी सरकारच्या दडपशाहीविरोधात हे आंदोलन करण्यात आले. काँग्रेसने महात्मा गांधींचे स्मृतीस्थळ राजघाट येथे सोमवारी उपोषण केले. राजघाटावर उपोषण होणार असल्याने दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी सकाळपासून येथे हजेरी लावली. राहूर गांधी उपोषणस्थळी दुपारी 1 ला आले. सायंकाळ 4 वाजेपर्यंत उपोषण सुरू होते.
टायटलर, सज्जन कुमारांना हाकलले
काँग्रेस नेते जगदीश टायटलर आणि सज्जन कुमार यांनीही येथे हजेरी लावली. मात्र, त्यांना काँग्रेसच्या पदाधिकार्यांकडून राजघाट परिसरातून जाण्यास सांगण्यात आले आहे. हे दोन्हीही नेते 1984 मध्ये झालेल्या शीख दंगलीतील आरोपी आहेत. राजघाट परिसरात काँग्रेसच्या उपोषणासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र ठरलेल्या वेळेपेक्षा हे उपोषण सुरु होण्यास तब्बत तीन तास उशीर झाल्याने काँग्रेस नेते टीकेचे धनी बनले आहेत.
छोले भटुरेवर ताव देशातील दलितांवरील वाढत्या अन्यायाविरोधात
दिल्लीतील राजघाटवर काँग्रेसकडून एक दिवसीय उपोषण सुरू आहे. या उपोषणाचे नेतृत्व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी करत आहेत. याचदरम्यान, काँग्रेसचे काही नेते छोले-भटुरेवर ताव मारतानाचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. काँग्रेस नेते अरविंद सिंग लवली यांनी हे छायाचित्र सकाळी आठ पूर्वीचे असल्याचे सांगीतले. मात्र भाजपने या छायाचित्रावरून काँग्रेसची चांगलीच फिरकी घेतली.
उशीरा झोपून उठण्याची त्यांची स्टाईल
राहुल गांधींच्या उपोषणावर भाजपाने उपहासात्मक टीका केली आहे. भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट करुन म्हटले की, राहुलजी तुमचे जेवण झाले असेल तर उपोषणा बसा आता. राहुल गांधी उशीरा उपोषण स्थळी आलेत कारण त्यांना उशीरा झोपून उशीरा उठण्याची आपली स्टाईल आहे.