जळगाव । अनेक सामाजिक संघटना विविध प्रकारचे उपक्रम उत्साहाने राबवतात. महिलांच्या संघटनाही पुढाकारावे वेगवेगळे प्रयोग करतात. मात्र अशिक्षीत महिलांना शिक्षीत करण्याचा एक लक्षवेधी उपक्रम जळगाव येथील इनरव्हील क्लबने रिंगणगाव (ता. जळगाव) येथे राबविला. यासाठी रिंगणगाव ग्रामपंचायत पदाधिकारी व इतरांनी सहकार्य केले.रिंगणगावच्या सरपंच मृदुला कुळकर्णी यांनी गावातील महिलांसाठी यावर्षी शिक्षीत करण्याचा वर्ग घेण्याविषयी जळगाव येथील इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष कांचन कांकरिया यांच्याकडे विषय मांडला. त्यावर सचिव गुंजन कांकरिया, बिना गांधी यांनी चर्चा करून वर्ग घ्यायचे ठरविले.
शिकवण्यासाठी वर्गात दोन महिलांची केली नियुक्ति
या वर्गासाठी जयश्री पाटील व नीलिमा राजाराम नेवे यांची नियुक्ती करण्यात आली. महिलांना अक्षर ओळख करुन लेखन करणे शिकविणे हे उद्दिष्ट नक्की केले. त्यानंतर वर्ग सुरु झाला. यात वृध्दांसह नवविवाहीतीही शिकण्यासाठी येत गेल्या संख्या 60 पर्यंत गेली. जवळपास 3 महिने वर्ग सुरु होता. महिलांना पाट्या व पुस्तके इनरव्हील क्लबने दिले. शैक्षणिक वर्ग पूर्ण करणार्या सर्व महिला व शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला.
शिक्षण वर्गास मदत करणारे सर्वजण यावेळी उपस्थित होते. वर्गात सहभागी महिलांनी शिक्षणामुळे आपल्यात काय बदल झाले हे सांगितले. अनेकींनी आत्मविश्वास वाढल्याचे नमुद केले. वर्गातील जवळपास सर्वाच महिलांनी 3 महिने एकदाही दांडु न मारता वर्ग पूर्ण केला, प्रत्येक महिला अक्षर ओळख शिकून सही करायला लागली. महिलांचे कौतुक म्हणून इनर व्हील क्लबतर्फे भेटवस्तू व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. महिलांना शिकविणार्या शिक्षीकांचा सत्कार करण्यात आला.
यशस्वितेसाठी यांनी घेतले परीश्रम
रिंगणगावचे उपसरपंच डॉ. हेमराज ढगे, डॉ. अविनाश कुलकर्णी, अंगणवाडीच्या माजी पर्यवेक्षिका सुमित्रा केसकर, ग्रा. पं. महिला सदस्य सरला महाजन, लक्ष्मी माळी, उषाबाई सोनवणे, नर्मदा मोरे, पोलीस पाटील वासुदेव मोरे, जि. प. शाळा शिक्षण समिती अध्यक्ष गजानन माळी, प्राथमिक आरोग्य केंद्र ए. एन. एम. सविता पाटील तसेच इनर व्हील क्लबच्या नूतन कक्कड, आबेदा काझी, बिना गांधी, शैला कोचर, संध्या महाजन, ज्योती रांका, शोभा काबरा, सरिता कांकरिया, वीणा कांकरिया हे महिलांच्या सत्कारासाठी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रा.पं.कर्मचारी रवींद्र पाटील, मनोज कुलकर्णी, ग्रामसेवक सतीश सूर्यवंशी, अनिल चौधरी, जयश्री पाटील, नीलिमा नेवे यांचे अनमोल सहकार्य लाभले.